अक्षयची पगडी केसरी, अजय म्हणतो 'मेरी जुबाँ केसरी...'; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

'केसरी' प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या कथानकाव्यतिरिक्त आणखी एका कारणामुळे गाजतोय.

Updated: Feb 22, 2019, 08:27 AM IST
अक्षयची पगडी केसरी, अजय म्हणतो 'मेरी जुबाँ केसरी...'; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल title=

मुंबई : यंदाच्या वर्षी होळीच्या मुहूर्तावर अभिनेता अक्षय कुमार एका शौर्यगाथेच्या साथीने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'केसरी' या चित्रपटाच्या निमित्ताने खिलाडी कुमार शीख सैनिकांच्या तुकडीचा पराक्रम सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. साराढीच्या युद्धावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ज्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या या ट्रेलरची सर्वांनीच प्रशंसा केली. देशभक्तीपर चित्रपटांमध्ये अक्षय नेहमीच सर्वस्व अर्पण करत अभिनय करतो ही बाब काही नवीन नाही. पण, तरीही 'केसरी' हा काहीसा खासच. 

'केसरी' प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या कथानकाव्यतिरिक्त आणखी एका कारणामुळे गाजतोय. ते कारण म्हणजे ट्विटर आणि इतर माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या मीम्सचं. केसरीमधील काही संवादांच्या मदतीने सोशल मीडियावर काही असे मीम्स साकारण्यात आले आहेत, जे पाहता ते साकारणाऱ्यांच्या कल्नाशक्तीचीही अनेकांनीच दाद दिली आहे. 'आज मेरी पगडी भी केसरी, जो बहेगा मेरा लहू भी केसरी और मेरा जवाब भी केसरी', हा संवाद तर अनेक मार्गांनी वापरत त्याला विनोदी वळण देण्यात आलं आहे. 

अक्षय कुमारच्या 'चल झुठा', या संवादावरुनही काही मीम्स तयार करण्यात आले आहेत. या साऱ्यामध्ये अभिनेता अजय देवगणलाही नेटकऱ्यांनी सोडलेलं नाही. एका जाहीरातीत 'बोलो जुबाँ केसरी' असं म्हणणाऱ्या अजयचाही या मीम्समध्ये समावेश करण्यात आला असून, ते मीम जास्तच व्हायरल होत आहे. 

परिणीती चोप्रा, अक्षय कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे शीख सैनिकांच्या साहसाची गाथा सांगणारा हा 'केसरी' आता बॉक्स ऑफिसरवर दणक्यात कमाई करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.