मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचं Abhishekh Bachchan नाव अनेक वेळा वेगवेगळ्या प्रोजेक्टमुळे चर्चेत होतं. 'बंटी और बबली' सिनेमाचा सिक्वल लवकरच येणार अशी देखील चर्चा होती. आता पुन्हा अभिषेक बच्चन एका नव्या प्रोजेक्टमध्ये सहभागी असल्याचं समजत आहे.
ज्युनिअर बच्चन शाहरूख खानचं प्रोडक्शन हाऊस रेड चिल्लीस एंटरटेनमेंटसोबत एका नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. अभिषेक बच्चन 'बॉब बिस्वास'मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा दिग्दर्शक सुजॉय घोषच्या 'कहानी' सिनेमाचा प्रीक्वल असणार आहे. हा सिनेमा 'कहानी' सिनेमाचा खलनायक आणि सीरियल किलर बॉब बिस्वासवर आधारित आहे.
'कहानी' सिनेमात बॉब बिस्वासची भूमिका बंगाली अभिनेता शास्वत चॅटर्जीने साकारली होती. सिनेमात त्यांच्या अभिनयाची खूप चर्चा झाली. तसेच या थ्रिलर ड्रामा सिनेमाचं दिग्दर्शन सुजॉय घोष यांची मुलगी दिया घोष करणार असून दियाचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आहे. या सिनेमात निर्माता म्हणून शाहरूख खानसोबत सुजॉय घोष देखील असणार आहेत. बाऊंड स्क्रिप्ट प्रोडक्शन या नावाने या सिनेमाची निर्मिती होणार आहे.
'कहानी' सिनेमाच्या प्रीक्वलचं नाव, अभिनेत्याचं नाव आणि मुख्य पात्रसमोर आल्यानंतर या सिनेमात विद्या बालनच असणार की नाही यावर मात्र अजून शिक्कामोर्तब झालेला नाही. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पा' सिनेमात अभिषेक आणि विद्या बालन एकत्र दिसले होते.
अभिषेक बच्चन अनुराग कश्यपच्या 'मनमर्जियां' सिनेमांत तापसी पन्नू आणि विक्की कौशलसोबत दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नव्हता पण काही प्रेक्षकांच्या पसंतीचा हा सिनेमा आहे. तसेच अभिषेक लवकरच डिजिटल डेब्यू करणार आहे. ऍमेझॉन प्राइमच्या 'ब्रीथ' च्या दुसऱ्या सीझनमध्ये अभिषेक असणार आहे.