'मी माझ्या आयुष्यात सर्व अनुभव....', अभय देओलचा आपल्या लैंगिकतेबद्दल धक्कादायक खुलासा

अभय देओलला (Abhay Deol) त्याच्या लैंगिकतेबद्दल (Sexuality) विचारण्यात आलं असता त्याने एखाद्या साच्यातील उत्तर देण्यास नकार दिला आणि ही अशी गोष्ट नाही जी व्याखेत सांगितली जाऊ शकत नाही असं म्हटलं.   

शिवराज यादव | Updated: Jul 25, 2024, 04:45 PM IST
'मी माझ्या आयुष्यात सर्व अनुभव....', अभय देओलचा आपल्या लैंगिकतेबद्दल धक्कादायक खुलासा title=

बॉलिवूडमध्ये अभय देओलने (Abhay Deol) आपली वेगळी छाप उमटवली आहे. देओल कुटुंबातून असतानाही अॅक्शन, डान्स अशा भानगडीत न पडता त्याने वेगळ्या पठडीतले चित्रपट निवडले आणि आपली ओळख निर्माण केली. देव डी, ओये लकी लकी ओये अशा चित्रपटांमधून त्याने तर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. खरं तर त्याने अभिनेत्याची परिभाषाच बदलली.  दरम्यान नुकतंच त्याने The Dirty Magazine ला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर परखडपणे मत मांडलं. यावेळी त्याने राजकीयदृष्ट्या योग्य असण्यावरही भाष्य केलं. तसंच लैंगिकतेबद्दलही उघडपणे सांगितलं. 

"स्पेक्ट्रम म्हणून. मी लैंगिकता ओळखण्याच्या पाश्चात्य पद्धतीला नकार देतो कारण ती खूप कृष्णधवल आहे. पूर्वेकडील दृष्टीकोन खूप वेगळा आहे, तो आपल्या सर्वांना वेगळी ओळख देतो. मी माझ्या लैंगिकतेची व्याख्या करत नाही आणि हे वादग्रस्त वाटू शकते. पण माझ्यासाठी हे असे काही नाही की ज्याची व्याख्या करता येईल," असं अभय देओल म्हणाला आहे. 

तो पुढे म्हणाला की त्याच्या मते 'आपण ते सर्व आहोत'. "मला वाटतं की हे समोरच्या व्यक्तीच्या सोयीसाठी अधिक आहे, जेणेकरून ते तुम्हाला एका साच्यात बसवू शकतील. तुम्हाला नीटनेटकेपणे वेगळे करु शकतात. मी स्वत: ला पाश्चात्य भाषेत का परिभाषित करावे? मी माझ्या आयुष्यात सर्व अनुभव घेतले आहेत आणि मी ते कायम करणार आहे.  ते कसे लेबल करावे हे माहित नाही, माझ्या मते आपल्या सर्वांमध्ये पुरुष आणि स्त्री आहे. त्यामुळेच आपण सर्व ते आहोत," असं मत त्याने मांडलं आहे. 

त्याच मुलाखतीत, अभयने 'लोकांना सुरक्षित वाटण्याची आणि समाविष्ट करण्याची क्षमता' म्हणून पुरुषत्वाकडे कसं पाहिलं जातं याबद्दल सांगितलं. एक पुरुष म्हणून मला 'सुरक्षा देणारा आणि गोष्टी पुरवणारा' म्हणून पाहिलं जातं असं तो म्हणाला. तसंच जर एखाद्या महिलेची कार्यभार स्वीकारण्याची आणि नेतृत्व करण्याची इच्छा असल्यास आनंदाने आपण माघार घेऊ अशी कबुलीही त्याने दिली.

अभयने यावेळी आपण लपत नाही, परंतु त्याचा बहुतेक वेळ गोव्याच्या घरी घालवतो अशी माहिती दिली. तो पुढे म्हणाला की गेल्या नऊ वर्षांपासून, मी लॉस एंजेलिसमध्ये देखील बराच वेळ घालवत आहे. मी तिथो लोकांसाठी अनोलखी असल्याने ते बरं पडतं असं त्याचं म्हणणं आहे. अभय लवकरच शबाना आझमी, झीनत अमान आणि लिन लैश्रामसोबत 'बन टिक्की'मध्ये दिसणार आहे.