Milind Gawali Instagram Post For Daughter : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिकांच्या यादीत आई कुठे काय करते या मालिकेचे नाव अव्वलस्थानी पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसते. या मालिकेतून अनेक कलाकार हे प्रसिद्धीझोतात आले. या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारणारे अभिनेते म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. मिलिंद गवळी यांनी आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक अनुभव सांगितला आहे.
मिलिंद गवळी यांनी गुढीपाडव्यानिमित्ताने आयोजित केलेल्या मोटारसायकल रॅलीत सहभाग घेतला. यावेळीचा एक व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत मिलिंद गवळी हे मोटारसायकल रॅलीचा आनंद घेताना दिसत आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी स्त्रीशक्तीबद्दलच्या एका अनुभवाबद्दल भाष्य केले. तसेच त्यांनी महिलांच्या कर्तृत्वाचेही कौतुक केले.
"जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात ठाण्यामध्ये स्टार प्रवाह आणि दैनिक पुढारीने व कस्तुरी क्लब ने गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिलांची मोटरसायकल रॅली आयोजित केली होती, महिला सक्षमीकरणाच्या निमित्ताने, स्टार प्रवाहचे “आई कुठे काय करते” या मालिके मधून मी म्हणजे अनिरुद्ध देशमुख आणि संजनाला आमंत्रित केलं होतं.
माझ्यासाठी हा अगदीच आगळा वेगळा अनुभव होता, 1000 हून अधिक महिला मोटरसायकल चालवत होत्या, अगदी नऊवारी साडी नेसून फेटा बांधून, काही पुरुषांना लाजवतील अशा छान पैकी मोटरसायकल चालवत होत्या, काही महिलांकडे चक्क एन्फिलच्या 350cc बाईक्स होत्या, माझी लेक मिथिला ज्यावेळेला एनफिल्ड चालवते, आणि त्या गोष्टीचा मला खरंच खुप अभिमान आणि गर्वच वाटतो, कारण आज कित्येक पुरुषांना सायकल सुद्धा चालवता येत नाही, तिथे या मुली हे करून दाखवतात.
परवा अशा सुंदर च्या पाडव्याच्या सोहळ्यामध्ये स्टार प्रवाह आणि दैनिक पुढारीने मला सुद्धा त्या हरहुनरी बायकांबरोबर मोटरसायकल चालवायची संधी दिली, त्यानंतर कोकिलाबेन हॉस्पिटलच्या डॉक्टर यांनी महिलांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यायला हवी यावर छान से लेक्चर दिलं, महिलांनी वर्षातून एकदा तरी पूर्ण चेकअप करणं गरजेचं आहे असं त्यांनी कंटाळून सांगितलं, जर तुम्हाला सिरीयल बघायला वेळ मिळत असेल तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला सुद्धा तुम्हाला वेळ काढावा लागेल, तुम्हाला जर तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला स्वतःची काळजी घेणं खूप आवश्यक आहे, मला त्यांचं बोलणं पटलं, त्या डॉक्टरांचा सल्ला सगळ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, मला खरंच छान वाटलं, मागच्या वर्षी पाडव्याला गिरगाव मध्ये ढोल झांज पथकामध्ये मला ढोल वाजवण्याची संधी मिळाली होती, तेव्हाही मी भारावूनच गेलो होतो, मी स्वतः स्त्रीशक्तीला खूप मानतो, माझी आई स्त्री शक्तीची आदर्श आहे", असे मिलिंद गवळी यांनी म्हटले आहे.
दरम्यान मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. यावर अनेक महिलांनी कमेंट करत ते खूप सुंदर दिसत असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.