मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते, कलाकार सतत सुशांतबाबत पोस्ट करत आहेत. या दरम्यान सुशांतचा एक 4 वर्षांपूर्वीचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 2016 या वर्षातील आहे. त्यावेळी शैलेश जे. मेहता स्कूल ऑप मॅनेजमेंट, आयआयटी बॉम्बेमध्ये एक सेशन ठेवण्यात आलं होतं. या व्हिडिओमध्ये सुशांत त्याच्या इंजिनियरिंगपासून सिव्हिल सर्विसेज आणि बॉलिवूडमध्ये अभिनेता बनण्यापर्यंतच्या त्याच्या प्रवासापर्यंत बोलत आहे.
लहानपणापासूनच त्याला असं वाटतं होतं की, पैसा आणि ओळख हीच आनंदाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे. मात्र प्रत्यक्षात हे सर्वात मोठं खोटं आहे, असं तो म्हणतो. सुशांतने तो मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याचंही सांगितलं. सुशांतला त्याच्या कुटुंबीयांनी इंजिनियर होण्याबाबत सांगितलं होतं. सुशांतने इंजिनियरिंगसाठी दिल्लीतील कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये ऍडमिशन घेतलं.
त्याचदरम्यान तो अभिनयाकडे वळला आणि त्याला हे क्षेत्र आवडू लागलं. तीन वर्षांनंतर सुशांतने इंजिनियरिंग सोडण्याचा निर्णय घेतला. केवळ दोन सेमिस्टर बाकी असताना त्याने इंजिनियरिंग सोडलं. अभिनेता बनण्यासाठी तो मुंबईत आला आणि इंजिनियरिंगची डिग्री अर्धवटच राहिली. सुशांतला प्राईम टाईम टेलिव्हिजन शोमधून ब्रेक मिळाला. या शोमधून त्याला मोठी ओळखही मिळाली. जितक्या योजना त्याने आपल्या भविष्यासाठी बनवल्या होत्या, त्याहून अधिक त्याच्याकडे आहे, असंही सुशांतने या सेशनमध्ये सांगितलं होतं.