सुनील घुमे, झी मीडिया, मुंबई : 14 फेब्रुवारी... व्हॅलेंटाइन डे... जगभरातल्या तमाम प्रेमवीरांचा खास दिवस... WILL YOU BE MY VALENTINE? अशा शब्दांत आपल्या लाडक्या प्रेयसीला किंवा प्रियकराला प्रपोज करण्याचा दिवस... तुमची प्रेमळ विनंती ती किंवा तो मान्य करतो.. प्रेमाच्या रोमांचक सिनेमाचा 'हॅप्पी दि एन्ड' होतो... 'शुभ मंगल सावधान' होतं... तो आणि ती संसाराचा रहाटगाडा ओढू लागतात... आणि मग पुन्हा येतो 'व्हॅलेंटाइन डे'... लग्न झालेल्यांचा 'व्हॅलेंटाइन डे' असतो तरी कसा...? वाचा...
..................
स्त्री ही क्षणाची 'व्हॅलेंटाइन' आणि अनंत काळची 'बायको' असते...
हे वाक्य अजयच्या तोंडून ऐकले आणि मी ताडकन उडालो...
अजय आणि मानसीचे लव्ह मॅरेज... लग्नाला चांगली दहा-बारा वर्षे झालेली... लग्नाच्या आधी पाच-सहा वर्षे त्यांचे अफेअर सुरू होते. म्हणजे एकमेकांना ते दोघेही चांगलेच ओळखतात. अधुनमधून आपल्या पिल्लाला सोबत घेऊन कधी काश्मीरला तर कधी केरळला, कधी दिल्लीला तर कधी राजस्थानला, त्यांच्या सफरी सुरू असतात. फेसबुकवर त्यांचे एकमेकांसोबतचे फोटो पाहिले की, त्यांचा संसार सुखेनैव सुरू आहे, याची खात्री पटते. त्यामुळे अजयने हे असे उद्गार काढावेत, याचे आश्चर्य वाटते...
'अरे बाबा, बायको ही बायकोच असते... मग ती लव्ह मॅरेजवाली असो की अरेंज्डवाली... लग्नाआधीचे ते गोड, लाघवी बोलणे नंतर गायब होते....' त्याची ती दर्दभरी दास्ताँ तो ऐकवू लागला.
'म्हणजे तुम्ही आता पूर्वीसारखा व्हॅलेंटाइन डे साजरा करत नाही का?' मी त्याला थेट विचारले.
त्यावर तो म्हणाला, 'म्हणजे काय? व्हॅलेंटाइन डे करतो ना साजरा... तसा रीवाजच आहे आमच्या घरातला. यंदाही साजरा करणार. ठाण्याला नवीन रेस्टॉरंट सुरू झाले आहे. तिथे घेऊन जाणार आहे बायकोला... तिथून मग सिनेमाला वगैरे जाऊ. जमलेच तर एक लाँग ड्राइव्ह... झाला व्हॅलेंटाइन डे साजरा...'
अजयच्या उत्तराने आणखीच चक्रावून गेलो. म्हणजे आजवर साजरा करत आलो आहे म्हणून हा 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करणार. त्यात प्रेमाचा ओलावा कमी आणि 'बायकोला बरे वाटावे' ही भावना जास्त डोकावत होती. त्याची व्हॅलेंटाइन आता पक्की बायको बनली होती आणि हा देखील तिचा सख्खा नवरा...
संसाराच्या व्यापात गुरफटलेल्या अनेक प्रेमी जीवांचे अजय आणि मानसीसारखेच होते का? म्हणजे लग्नाआधी व्हॅलेंटाइनच्या दिवशी हँगिग गार्डनमध्ये हातात हात घेऊन फिरताना पोटामध्ये फुलपाखरे बागडायची. तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी काय गिफ्ट घ्यायचे, या विचाराने गुदगुल्या व्हायच्या. ती व्हॅलेंटाइन डेची क्रेझ आता देखील तशीच वाटते का?
'लग्नानंतर पहिल्या दोन-तीन वर्षातच ही क्रेझ ब्रिझ सगळे मावळून जाते. संसाराच्या चक्रात एकदा गुरफटलात की, गुरफटलात... त्यात एखादे मूलबाळ झाले की झाले.. नोकरी,बाळ आणि कौटुंबिक जबाबदा-या यात व्हॅलेंटाइनमधला व्ही देखील आठवत नाही...' पक्का संसारी झालेला दीपक आपला अनुभव सांगत होता. 'आणि हे सगळे लग्नाआधी करायचे असते. तेव्हा तुमच्याकडे वेळही असतो आणि भरपूर ऊर्जा देखील. विविध जबाबदा-यांनी तुमचे खांदे वाकलेले नसतात. अगदी इच्छा असली तरी लग्नानंतर व्हॅलेंटाइन डे साजरा करणे नाही जमत...' असे सांगून दीपकने या विषयाला पूर्णविराम दिला.
माधुरी मात्र दरवर्षी न चुकता अगदी छान व्हॅलेंटाइन डे एन्जॉय करते...
'आमचे अरेंज्ड मॅरेज आहे. लग्नानंतर पहिल्याच व्हॅलेंटाइन डेला त्याने मला छान सरप्राइझ दिले होते. कामावरून उशिरा रात्री मी घरी पोहोचले. सगळे आवरून झोपायला गेले. पण अनिकेतचा हॉलमध्येच टाइमपास सुरू होता. बरोबर बाराच्या ठोक्याला त्याने मला बाहेर बोलावले. त्याने छान केक आणला होता. तो आम्ही एकत्र कापला. मग त्याने मला खूण करून तनिष्कची प्लास्टिकची बॅग दाखवली. त्यामध्ये माझ्यासाठी खास हि-याचा नेकलेस होता... ओ माय गॉड... तो व्हॅलेंटाइन डे मी कधीच विसरू शकत नाही....'
माधुरीच्या चेह-यावरच्या भावमुद्रा बरेच काही सांगत होत्या.
'यंदाही आम्ही व्हॅलेंटाइन डे प्लान केला आहे. मला तो एमआयचा मोबाईल फोन गिफ्ट देणार आहे. मी देखील काहीतरी घेईन अनिकेतसाठी... पिक्चरला जाऊ आणि रात्री डिनरला...' तिने पटापट आपला बेत सांगून टाकला.
किशोर आणि मनालीचे लव्ह कम अरेंज्ड मॅरेज... म्हणजे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि सहा महिन्यातच त्यांचा साखरपुडा देखील झाला. वर्षभरात लग्नही झाले... लग्नाला जेमतेम चार वर्षे झाली. पण पहिल्या व्हॅलेंटाइन डेला नेमके काय गिफ्ट दिले, तेच मुळी किशोरला आठवत नव्हते.
'व्हॅलेंटाइन डे..? नक्की काय गिफ्ट दिले नाही आठवत यार... नाही, नाही... आम्ही व्हॅलेंटाइन डे नाहीच साजरा केला कधी. मी तिला गिफ्ट दिलीत... पण व्हॅलेंटाइन डेला नसावीत...' किशोरला नक्की काहीच सांगता येत नव्हते. मग हाच प्रश्न मनालीला विचारला...
'आमचे कुठले आले आहे एवढे थोर नशीब...? माझा नवरा कायम ऑफीसच्या कामात व्यस्त असतो. ऑफीस एके ऑफीस... त्यामुळे व्हॅलेंटाइन डे वगैरे खुप लांबच्या गोष्टी आहेत. बर्थडेला तो न चुकता गिफ्ट देतो... हे ही नसे थोडके...' ती थोड्या लटक्या रागानेच म्हणाली.
स्वप्नील आणि स्मिताचे लग्नच झाले ते व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर... 'तीन-चार वर्षे आमचे लव्ह अफेअर सुरू होते. मुंबईतील एकही चौपाटी आम्ही फिरायची बाकी ठेवलेली नव्हती. व्हॅलेंटाइन डे तर अगदी खास दिवस असायचा. आम्ही एकमेकांना गिफ्ट घ्यायचो... मनसोक्त भटकायचो. अगदी नोकरीला लागल्यानंतरही आवर्जून यादिवशी सुट्टी घ्यायचो. आता देखील घेतो. पण व्हॅलेंटाइन डेची जागा आता लग्नाच्या वाढदिवसाने घेतलीय. मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत साजरा करतो आम्ही 14 फेब्रुवारी...' स्वप्नीलने सांगितले.
'लग्नाआधी व्हॅलेंटाइन डेला मला एक-दोन नव्हे, तीन-तीन गिफ्ट घ्यावी लागायची...' विशालने मोठाच गौप्यस्फोट केला होता.
'काय होते की, माझ्या बायकोच्या दोन मैत्रिणी होत्या. या तिघी एकमेकींच्या जीवश्च कंठश्च मैत्रिणी... माझ्या बायकोला प्रपोज करण्याआधी त्या दोघींची मनधरणी मला करावी लागली होती. आमच्या प्रेमसंबंधांतला महत्त्वाच्या दुवा होत्या त्या... मग त्यांना वगळून कसे चालणार? त्यामुळे व्हॅलेंटाइन डेला तिघींनाही गिफ्ट घ्यावे लागायचे. ते सुद्धा एकसारखेच...' विशालने माहिती पुरवली...
'अजूनही तीन गिफ्ट घ्यावी लागतात का'? असे विचारल्यावर तो हसायला लागला...
'नाही यार... आता त्या दोघींचीही लग्ने झाली. आम्ही एकमेकांच्या टचमध्ये असतो. पण आता पूर्वीसारख्या रोजच्या गाठीभेटी होत नाहीत. त्यामुळे आता एकच गिफ्ट घ्यावे लागते...', विशालने खुलासा केला.
लग्नानंतर व्हॅलेंटाइन साजरा करायचा की नाही, असा मुलभूत आणि गहन प्रश्न अनेकांना पडलेला असतो. काहीजण केवळ उपचार म्हणून करतात साजरा... तर काहीजण चक्क विसरून जातात... पण असे विसरून जाणे चांगलेच महागात पडते. दीक्षाने याच कारणावरून गेल्यावर्षी आपल्या नव-याला चांगलेच फैलावर घेतले.
'गेल्या 14 फेब्रुवारीला मी आकाशला दांडी मारायला सांगितली. पण अर्जंट काम आहे, असे कारण सांगून हा गेला ऑफिसला. निदान संध्याकाळी घरी येताना हा काहीतरी घेऊन येईल किंवा छानसा प्लान बनवेल, असे वाटले होते. पण हा गेला विसरून... रोजच्याप्रमाणे आला घरी. मी तर स्वयंपाक देखील बनवला नव्हता.. आज व्हॅलेंटाइन डे आहे, हेच मुळी तो विसरला होता, ते लक्षात आल्यावर मी काही सोडले नाही त्याला... लग्नाआधी चांद-तारे तोडून आणण्याच्या गप्पा करायचा. पण सात वर्षात सगळे विसरला...' दीक्षाने त्याचे काय केले असेल, या कल्पनेनेच तारे दिसू लागले.
संदेश आणि मीना यांचाही प्रेम विवाहच, पण आंतरजातीय... संदेशला मुळी व्हॅलेंटाइन डे वगैरे पाश्चिमात्य परंपराच मान्य नाही. 'आम्ही नाही साजरा करता व्हॅलेंटाइन फॅलेंटाइन... हो, बायकोला गिफ्ट वगैरे घ्यायला नक्की आवडते. बर्थडेला वगैरे... अगदी मनापासून वाटले आणि सहज फिरता फिरता एखादी साडी किंवा ड्रेस आवडला तर मी पटकन घेऊन टाकतो. मग निमित्त असो नाहीतर नसो... गिफ्ट घ्यायला किंवा बायकोवर प्रेम करायला कशाला हवा व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त? आमचा वर्षाच्या 365 दिवस व्हॅलेंटाइन डे असतो...'संदेशने तत्ववेत्त्याच्या आविर्भावात आपली भूमिका मांडली...
हे देखील खरेच आहे... प्रेम करायला किंवा ते व्यक्त करायला, असा एखादाच दिवस का असावा? आपण ठरवले तर संदेशसारखा रोजच व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकतो. काय लागते त्यासाठी..? स्टेशनवर उतरल्यावर न विसरता गजरा विकत घ्यायचा आणि घरी आल्यावर अलगद बायकोच्या केसात माळायचा... स्वारी खुश झाली नाही, तर पैसा वापस....