कैलास पुरी,
प्रतिनिधी, झी २४ तास
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी थेट भाजपमध्ये न जात नवा पक्ष काढत स्वतंत्र चूल थाटली. पण, भाजपशी घरोबा कायम ठेवला. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर निवडून आणत मंत्रीपद द्यायचे हे भाजपचे ठरले खरे पण शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंचे मंत्री होण्याचे तर सोडाच पण विधानपरिषदेवर जायचे ही तूर्तास थांबले. शिवसेनेमुळे राणेंचा गेम झाला, ही चर्चा सुरु झाली आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार ही पुन्हा लटकला. त्यामुळे मंत्रीपदासाठी देव पाण्यात ठेवलेल्या आमदारांचा पुन्हा भ्रमनिरास झालाय. ही यादी खूप मोठी असली तरी राणेंच्या सध्याच्या गेममुळे सर्वाधिक गॅसवर कोण असेल तर पिंपरी चिंचवड मधले भाजप नेते...!
राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार, ही चर्चा सुरु झाल्यापासून पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्यापैंकी कोणाची तरी मंत्रीपदी वर्णी लागणार, अशी चर्चा सुरु झाली. खासकरून महानगरपालिकेत अशक्यप्राय वाटणारा विजय खेचत अजित पवारांचा बालेकिल्ला खालसा केल्यानंतर तर ही चर्चा अधिकच रंगली. दोन्ही आमदारांचे समर्थक आपल्याच नेत्याला मंत्रीपद मिळणार, यावर पैजा लावायला लागले. पण दुर्दैव... कित्येक दिवस मंत्रीपदाची स्वप्ने पाहणाऱ्या नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नारायण राणे आणि त्या अनुषंगाने राज्य पातळीवर घडलेल्या घडामोडींमुळे पुन्हा गॅसवर थांबावे लागलंय.
नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्यात वर्णी लागेल या आशेने भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक नगरसेवक कार्यकर्त्यांनी महेश लांडगे यांचा २७ नोव्हेंबर हा वाढदिवस डोळे दिपतील अशा पद्धतीने साजरा केला. एखाद्या हिरोला, मॉडेलला लाजवतील अशा महेश लांडगेंच्या छबी पिंपरी चिंचवडच्या चौका चौकात पाहायला मिळाल्या. काही समर्थकांनी तर मंत्रीसाहेब अशी संबोधनं देत लांडगेंना फ्लेक्सवरून शुभेच्छा दिल्या. वर्तमानपत्र, रेडिओ, टेलिव्हिजन या सर्वच माध्यमात लांडगे यांच्यावर त्यांच्या समर्थकांनी शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्यांची अपेक्षा एकच.... आमदार लांडगे, मंत्री लांडगे होतील. पण त्यांचे हे स्वप्न तूर्तास तरी राज्य पातळीवर घडलेल्या घडामोडींमुळे 'होल्डवर' आहे. असे असले तरी आज ना उद्या मंत्री पद मिळेल या आशेवर कार्यकर्ते आहेत.
शहरातले मंत्रीपदाचे दुसरे दावेदार आमदार लक्ष्मण जगताप यांना लांडगे यांच्याप्रमाणे शक्ती प्रदर्शनाची संधी मिळाली नसली तरी त्यांनी ही मंत्रिपदासाठी शांतीत क्रांती सुरु ठेवलीय. वरिष्ठ नेत्यांच्या भेटी, स्वतःचे वजन दाखवण्यासाठीची फिल्डिंग त्यांनी लावलीय. मुळात आमदार लांडगे अपक्ष पण भाजप सहयोगी आहेत तर जगताप अधिकृत भाजप आमदार... त्यामुळे शहराला मंत्रिपद मिळालेच तर ते आपल्याला असावे असा त्यांचा उघड नसला तरी दावा आहे. त्यासाठी त्यांची फिल्डिंग सुरु आहे. पण दुर्दैव... मंत्रीपद पुन्हा गॅसवरच...
आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्याप्रमाणे मंत्रीपदाच्या शर्यतीत आणखी कोणाचे नाव नसले तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या आझम पानसरे यांना ही राज्य पातळीवरच्या घडामोडींचा फटका बसलाय. मुळात भाजपमध्ये येताना आझम पानसरे यांना विधानपरिषदेवर आमदार किंवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद मिळेल अशी चर्चा होती. पण शहरात भाजपची सत्ता आणण्यासाठी जगताप, लांडगे यांच्याप्रमाणे महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेल्या पानसरे यांना काहीही मिळालेले नाही. जिथे आमदारांना काही मिळत नाही तिथे पानसरेंना काय मिळणार? हा प्रश्न निर्माण झालाय.
एकूणच काय तर, शिवसेनेने राणेंचा गेम केल्यानंतर अस्वस्थता मात्र पिंपरी चिंचवड शहर भाजपमध्ये वाढलीय. तूर्तास होल्डवर गेलेला विस्तार पुढे केव्हाही झाला तर त्यात एका तरी नेत्याची मंत्रीपदी निवड व्हावी ही अपेक्षा, अन्यथा अनेक नेत्यांना तेलही गेले आणि तूपही गेले असे म्हणावे लागते की काय ही शक्यता अधिक...!