5 राज्यांमधील राजकीय स्थिती आणि एक्झिट पोल

काय आहे 5 राज्यांमधील राजकीय स्थिती

शैलेश मुसळे | Updated: Dec 9, 2018, 06:05 PM IST
5 राज्यांमधील राजकीय स्थिती आणि एक्झिट पोल title=

मुंबई : 5 राज्यांमध्ये मतदान झाल्यानंतर शुक्रवारी अनेक एक्झिट पोल समोर आले. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये सत्ता पालट होतांना दिसत आहे. वसुंधराराजे यांचं सरकार पडताना दिसत आहे. काँग्रेस येथे सत्तेत येत असला तरी मुख्यमंत्री कोण होणार याबाबत काँग्रेसमध्ये अजून कोणाचंही नाव पुढे करण्यात आलेलं नाही. दुसरीकडे तेलंगनामध्ये देखील टीआरएस सरकार येणार असं एक्झिट पोलमधून समोर आलं. 

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील चित्र अजूनही स्पष्ट नाही. मध्य प्रदेशमध्ये यंदा भाजपच्या जागा कमी होताना दिसत आहे. यामुळे काही पोलमध्ये काँग्रेस सत्तेत येणार असं देखील म्हटलं गेलं आहे. तर त्रिशंकु अवस्था देखील असण्याची शक्यता काही पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.

मध्य प्रदेशमध्ये जर शिवराज सिंह चौहान यांची सत्ता आली तर त्याच्या मागचं कारण एकच असू शकतं की, 13 वर्ष सत्तेत असूनही त्यांच्या स्वभावात कोणताच बदल झाला आहे. एक नेता म्हणून ते लोकांशी जोडलेले आहेत. ते संपूर्ण राज्यात फिरत असतात आणि लोकसंपर्क कायम ठेवतात. त्यांनी कधी कार्यकर्त्य़ांना नाराज केलं नाही. राज्यातील शेतकरी सरकारवर नाराज आहेत. जर जागा कमी झाल्या तर त्यामागचं हे एक कारण असू शकतं.
 
राजस्थानमध्ये मात्र स्थिती उलट आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना विविध समुदायाला आणि आपल्या कार्यकर्त्यांना देखील नाराज केलं आहे. त्याचाच फटका त्यांना या निवडणुकीत बसताना दिसत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान येथे कांटे की टक्कर पाहायला मिळाली. राज्यस्थानमध्ये तिकीट वाटपादरम्यान काँग्रेसकडून चूक झाली. त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातील वैयक्तीक वादामुळे काँग्रेसमध्ये अनेक बंडखोर नेते तयार झाले. यामुळे काँग्रेसला बंडखोरांचा सामना येथे करावा लागला. यानंतर जरी काँग्रेसचा विजय झाला तर याला एकच कारण असेल ते म्हणजे मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेला राग.
 
छत्तीसगडमध्ये परिस्थिती आणखी वेगळी आहे. राज्यातील मोठा भाग हा नक्षलवाद्यांशी प्रभावित आहे. येथे मतदार सार्वजनिकपणे बोलण्यास घाबरतात. त्यामुळे येथे एक्झिट पोल किती खरे ठरतात हे देखील पाहावं लागेल. छत्तीसगडमध्ये जर भाजपची सत्ता आली तर मुख्यमंत्री रमन सिंह यांनी गरिबांसाठी सुरु केलेल्या अनेक योजना त्याचं कारण असेल. या शिवाय अजीत जोगी आणि बसपा यांची युती झाल्यानंतर भाजप विरोधी मतांचं विभाजन हे देखील एक कारण असू शकतं.

तेलंगणामध्ये जर के. चंद्रशेखर राव यांचं सरकार आलं तर त्यामागचं कारण म्हणजे त्यांनी लोकांना अनेक गोष्टी स्वस्तात उपलब्ध करुन दिल्या आहेत. ज्यामध्ये वीज, पाणी, अन्नधान्य याचा समावेश आहे. यासाठी त्यांनी सरकारी तिजोरी खाली केली. यामुळे निवडणुकीत त्यांना फायदा होऊ शकतो. पण यानंतर विकासासाठी पैसा नसल्याने सरकार चालवणं कठीण होऊ शकतं. केसीआरला एका गोष्टीचा फायदा होऊ शकतो. काँग्रेसने चंद्रबाबू नायडू यांच्यासोबत हातमिळवणी केली. पण चंद्रबाबू यांनी वेगळ्या तेलंगणाला विरोध केला होता. त्यामुळे तेलंगणाचे लोकं त्यांना मतदान करणार नाहीत.