सोलापूर जिल्ह्यातल्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. उकळत्या तेलातून तिनं पाचचा शिक्का काढला. (The woman was forced to put her hands in boiling oil) हे काही थ्रिल नव्हतं. तिच्या चारित्र्याची परीक्षा होती म्हणे. ही परीक्षा कुणी द्यायला लावली, हा वादाचा मुद्दा आहे. पण या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा विचारांचं चक्र सुरु झालंय. महिलांचे अधिकारी त्यांचं समाजातलं स्थान आणि आपल्या संस्कारांचं मुळ याविषयीच व्यक्त झाल्या आहेत आमच्या प्रतिनिधी आणि अँकर सुवर्णा धानोरकर….
तिचं चारित्र्य आणि पुरुषाचं काय? त्याला चार बायकांसोबत झोपायचा अधिकार आहे का? कुणी दिला त्याला हा अधिकार? त्याच्यासाठी जात नाही, चारित्र्य नाही, त्याला घरात येण्यासाठी वेळकाळ नाही, त्याला प्रश्न विचारणारं कुणी नाही, का आणि कुणी दिले त्याला हे अधिकार? कुठल्याही जातीधर्मात प्रश्न फक्त बाईच्या चरित्र्याचाच असतो. पुरुषाला चारित्र्य नसतंच मुळी. त्याला असतो तो फक्त अधिकार. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा, तिच्या घरी येण्याच्या वेळा ठरवण्याचा. तिनं कुठले कपडे घालायचे, कुठल्या रंगाचे कपडे घालायचे, तिनं कुणाशी बोलायचं, कुणापुढे मान खाली घालून उभं राहायचं हे ठरवण्याचा, तिनं काय खावं आणि काय खाऊ नये हे ठरवण्याचा, तिनं रोज कायकरावं कायकरू नये हे ठरवण्याचा, कॉन्ट्रासेप्टिव्ह तिनंच वापरायचे हे ठरवण्याचा, फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन तिनंच करावं हे ठरवण्याचा, मनात येईल तेव्हा बायकोला अंगाखाली घेण्याचा, नाहीच आवडली बायको तर बाहेरख्यालीपणा करण्याचा, तिला सोडण्याचा, चार लग्न करण्याचा आणि तरीही आणखी चार बायकांसोबत झोपण्याचा, रस्त्यानं येताजाता दुसऱ्या बायापोरींच्या अंगचटीला जाण्याचा, आसपास दिसणाऱ्या बायकांना आपदमस्तक न्याहाळून नजरेनंच बलात्कार करण्याचा, आणि हे सगळं करूनही समाजात ताठ मानेनं जगण्याचा, म्हणून म्हटलं त्याला असतो तो फक्त अधिकार आणि तिला असतं ते फक्त चारित्र्य.
एवढंच कशाला रोज त्याच्या तोंडात येणाऱ्या शिव्यासुद्धा स्त्रीलिंगीच... इतकं का समाजानंस्त्रीला हीन करावं? आम्हाला कामाख्या देवी चालते, पण पाळी आलेली बायको चालत नाही, तिच्या हातचं जेवण चालत नाही. पाळीतल्या बाईच्या हातचं खायचं म्हणजे काही महिलांनाही तो विटाळ वाटतो. पाप वाटतं. गर्लफ्रेंड कमी कपड्यातली हवी, चारचौघात माझी कॉलर टाईट होईल अशी. पण बायको साडीतली, अंग झाकलेलीच हवी. बायकोनं कमी कपडे घातले की तिचं चारित्र्य चर्चेत येणार. ती परपुरषाशी मोकळेपणानं बोलली की चर्चा तर होणारच. तिचं चारित्र्य प्रत्येक पुरुषाला चघळायला आवडतच. मग ती मैत्रीण असो, शेजारीण असो की मग सहकारी. चवीनं चघळायचं. त्याशिवाय आयुष्यााल रंग येत नाही. आपल्या आसपासही असे अनेक पुरुष असतील कधीतरी डोळे नीट उघडून बघा.
हे फक्त कमी शिकलेल्या गावातल्या बायकाच फेस करतात का? मुळीच नाही. अगदी आपल्या आसपासच्या बायकांसोबतही असं रोज घडतं. नोकरी करणाऱ्या, चांगल्या हुद्द्यावर असणाऱ्या महिलांबाबतही हे घडतं पण त्यांच्याही ते इतकं अंगवळणी पडलेलं असतं की त्यांना याचं काहीच वाटतं नाही, असं मला वाटतं. आणि जिला वाटतं, फरक पडतो ती मग आवाज उठवते. मग समाजानं तिला चारित्र्यहीन ठरवायचं असतं, हा अलिखित नियमच जणू... आणि हो ठरवणाऱ्यांमध्ये तिच्याच आसपासच्या, ओळखीतल्या, नात्यातल्या, मैत्रीतल्या बायकाच जास्त असतात. त्याही तिचं चारित्र्य चॉकलेटसारखं चवीचवीनं चघळतात. पुन्हा तेच! ऐकून ऐकून बोअर झालेलं वाक्य 'स्त्रीच स्त्रीची शत्रू असते.’
बरं! तुम्ही ऐकलं कधी कुठल्या बाईनं पुरषावर बलात्कार केल्याचं? तिनं त्याला आपादमस्तक न्याहाळलं आणि त्यामुळे त्यानं शरमेनं मान खाली घातल्याचं? तिच्या अशा बघण्यामुळे त्यालाच गुन्हेगार झाल्यासारखं वाटलं असं ऐकलंय का हो कधी? नाही ना? आम्ही पिढ्यानपिढ्या संस्कारच तसे केलेयत. मुलींवर वेगळे, मुलांवर वेगळे. तु मुलगा मग तू काहीही कर... तू मुलगी मग तू हेच कर आणि येवढंच कर.... सगळं मूळ त्या संस्कारात... आताकुठे आम्ही थोडे बदलण्याचा प्रयत्न करतोय. पण मग उस्मानाबादसारख्या अशा बातम्या कानी येतात आणि सगळंच धुळीला मिळाल्यासारखं वाटतं. आता जबाबदारी आमचीच मुलांवर आणि मुलींवरही एकसारखेच संस्कार करण्याची. त्यांना सर्वार्थानं समान वागणूक देण्याची. यात खरा रोल स्त्रीचा असेल. प्रत्येकीलाच जिजाऊ आणि सावित्री व्हावं लागेल. गरजेनुसार तिला ठरवावं लागेल सावित्री व्हायचं की जिजाऊ. शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा असं वाटतं. पण शिवाबाची जिजाऊ आता प्रत्येक घरात हवी. तरच आणि तरच त्याचंही चारित्र्य महत्त्वाचं ठरेल आणि तिचाही अधिकार गाजेल.