...आणि 'कृष्ण' पुन्हा उदास आणि परत आनंदी झाला...!

पिंपरी चिंचवडमधील सद्य परिस्थिती मांडणारा ब्लॉग

Updated: Dec 24, 2021, 07:16 PM IST
...आणि 'कृष्ण' पुन्हा उदास आणि परत आनंदी झाला...! title=

कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : अंतिम चित्रपटाच्या प्रमोशन साठी पिंपरी चिंचवड परगण्यात आलेल्या भाईजान सोबत काढलेले फोटो पाहत असताना पोलिस मुख्यालयात 'कृष्ण' सर मिश्किल पणे हसत होते. भाईजानची पिळदार शरीरयष्टी असली तरी आपली ही त्याच्या पेक्षा काही कमी नाही असा विचार त्यांच्या मनाला शिवला आणि ते आणखीच प्रसन्न झाले. 

भाईजान बरोबरचे विविध अँगल मधले ते फोटो पाहत असतानाच नको ती वार्ता त्यांच्या कानावर पडली...! पोलिस मुख्यालयाच्या हद्दीत असलेल्या जवळच्याच चाकण प्रांतात एका पैलवानाला कोणी तरी गोळ्या घालून ठार मारले.. ! फक्त हे वृत्त कळले असते तरी चालले असते पण त्याच वेळी वार्तापत्रात, संकेतस्थळरूपी वार्ता विश्वात आणि काही दूरचित्रवाणी वाहिन्यांवर थेट पोलिस मुख्यालयात गुन्हेगारी वाढल्याच वृत्त झळकत असल्याचे त्यांना समजले...! त्याला आधार काय तर दोनच दिवसापूर्वी तळेगाव प्रांतात एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. 

आता या दोन घटना जरी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या तरी हे नतद्रष्ट वार्ताहर कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं वार्तांकन करतात असा विचार सरांच्या मनात आला आणि मिश्किल हास्य जात त्यांचा चेहरा उदास झाला..! 

महत्प्रयासाने मिळवलेला आयर्न मॅन चा 'किताब, सिंघम ही प्रतिमा, कमालीची लोकप्रियता असताना हत्ये सारख्या किरकोळ घटनांसाठी जबाबदार आपल्याला ठरवावे, काय म्हणावे याला, हा विचार करत आणि  शिव शिव शिव म्हणत 'कृष्ण' सर सिंहासनावरून उठले आणि दालनात फेऱ्या मारू लागले.

तिकडे नेहमी प्रमाणे प्रतिमा संवर्धनात महत्वाची भूमिका निभावणारा 'कल्याण' मन'इश, सर उदास आहेत हे पाहून कमालीचा घाबरला. आता आपली काही खैर नाही या विचाराने त्याने दालनातून काढता पाय घेतला. फेऱ्या मारत असताना सर मात्र अधिकाधिक उदास होत होते.

विविध पदांच्या भरती साठी झालेल्या परीक्षांतील उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या आरोपीना पकडले तरी आमच्यावर बोल लावला गेला... काय तर म्हणे आम्ही कारवाई केली नाही. अरे मुख्यालय हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून आम्ही कोण कष्ट घेतो...शहरातील द्यूत, जुगार, मद्य असले उद्योग आपण बंद केले. मुख्यालयाच्या अंतर्गत असलेल्या पोलिस ठाण्यातील अनेक अधिकारी नाराज असल्याची चर्चा कानावर आली तरी आपण बध्दलो नाही. 

काहींनी तर आपली रवानगी दुसऱ्या प्रांतात होणार अशी वंदता उठवली. तरी ही आपण दबलो नाही. उलट पक्षी अनेकांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतुकच आम्ही केले. तरी ही आमच्यावरच खप्पा मर्जी..! सुरुवातीला आपल्या कौतुकाचे रखाणेच्या रखाणे भरणारे हे वार्ताहर आता का आपला एवढा दुःस्वास करायला लागले हे त्यांना समजेना, आणि त्यामुळे ते आणखीच उदास होत होते. 

काय चुकतंय याचा शोध घेतलाच पाहिजे असा विचार त्यांनी केला आणि निर्धाराने ते पुन्हा सिंहासनावर विराजमान झाले. तेवढयात पिंपरी चिंचवड परगण्यात आणखी एक बॉलिवूड सेलिब्रेटी येणार असल्याची माहिती त्यांच्या कानावर पडली... चेहऱ्यावरची उदासी जाऊन त्याची जागा आनंदाने घेतली...! सेलिब्रेटी पुढे भाषण करताना कोणती कविता म्हणायची हा विचार करत ते उठले आणि प्रसन्न मनाने ते दालनाच्या बाहेर पडले. मुख्यालयातील शिलेदार सरांचा प्रसन्न चेहरा पाहून पुन्हा कामाला लागले...!

( पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या ४८ तासात दोन निघृण हत्या झाल्या...! पण तरी ही शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित आहे ...?)