जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : 'मुंबई ग नगरी बडी बांका... जशी रावणाची दुसरी लंका, असं मुंबईचं वर्णन शाहीर पठ्ठे बापूराव यांनी केलंय. ही आपली मुंबई, हमारी मुंबई प्रत्येकाला नेहमीच प्रिय राहणार आहे. पण कोरोना व्हायरस साथीच्या आजाराने मजुरांना मुंबई सोडावी लागतेय. मुंबईतले मजूर हे मुंबईला रत्नहारांचं रूप देतात, त्या हातांना आता काम नसल्याने त्यांना ती सोडावी लागतेय. मुंबई अशी सोडून जाण्याची वेळ पहिल्यांदाच नाही, तर अनेक वेळा आली आहे.
प्लेगची साथ आली तेव्हा देखील असंच चित्र होतं, असं सांगतात. पण त्यावेळी लोकसंख्या कईक पटीनं कमी होती. 'रावणाची दुसरी लंका' हे शब्द मुंबईला सध्याच्या स्थितीला चपखल बसतात. कारण मुंबईत सर्वच क्षेत्रात स्वत:ला भाई समजणारे आज चिंतेत आहेत.
कुणी बॉलीवूडचा बादशहा, कुणी अंडरवर्ल्डचा भाई, चाळकऱ्यांवर यंत्रणेचा वापर करून चाल करणारा बिल्डर, तर मुंबईतून पैसा कसा खेचायचा, असा विचार करणारे राजकारणी.
आज बॉलीवूड, उद्योग धंदे, बांधकाम, कॉर्पोरेट जगत थंडावलंय. मुंबईची लाईफलाईन लोकल जागच्या जागी उभी आहे. लोकलमध्ये जागेसाठी दादागिरी करणारे भाई जागच्या जागी घरातच आहेत. सकाळी सकाळी कचरेवाल्याला डस्टबिन खाली करताना येणारा बाटल्यांचा खणखण आवाज, आता एवढ्या शांततेतही कानावर येत नाहीय.
अभिनेत्रींच्या चेहऱ्यावरचे मेकअपचे थर हरवल्यासारखे आहेत. मेकअपशिवाय अभिनेत्रींचे चेहरे सोशल मीडियावर दिसतायत. मुंबईने मेकअप उतरवलाय सर्वांचा. दिसणारा आणि न दिसणारा.
सरकारी कार्यालयात खोके आणि पेटीची भाषा बोलणाऱ्यांच्या फाईलींना रद्दीतले कागद हसतायत. आकाशातली विमानांची घर घर थांबलीय. रावणाच्या दुसऱ्या लंकेतील सर्वच रावणांचं गर्वहरण झालं आहे. नुकसान झालंय, ते रोजचं कमवून खाणाऱ्यांचं.
रस्त्यावर ठेलेवाल्यांचा गोंगाट आणि ऐटीत ऑर्डर देणारा ग्राहक गायब झाला आहे. बटाटा वड्याचा मित्र पाव आणि त्याला आणणारा इम्पोर्टेड गाड्यांच्या गर्दीतून सायकलीने वाट काढणारा तो पाववाला कुठे आडोशाला गेला आहे माहित नाही.
'साहेब साहेब' आणि 'साहब साहब' म्हणून हातावर पोट भरणाऱ्या मजुरांवर मुंबई सोडण्याची वेळ आली आहे. पण मुंबईचा एक इतिहास आहे, मुंबई 'आपल्यातल्या' रावणांचं गर्वहरण केल्यानंतर पुन्हा वेग घेते सर्वसामान्यांचं पोट भरण्यासाठी.
अंडरवर्ल्डमध्ये स्वत:ला मुंबईचा भाई समजणारे येथेच एन्काऊंटरमध्ये चीतपट होतात. स्टारडमचा गर्व असणाऱ्यांचे सिनेमे येथेच फ्लॉप होतात. पालापाचोळ्याप्रमाणे रावणांचे मुकूट मुंबईत गळून पडतात. मग यात अंडरवर्ल्ड असो, बॉलीवूड किंवा शंभरमजली बिल्डिंगचा बडा बिल्डर.
भाईची जागा दुसरा स्वयंघोषित डॉन घेतो, आणि दुसऱ्या अभिनेत्यांना स्टारपण येतं. मुंबई सर्वांचं गर्वहरण करत, मुंबई सदा तरूण राहते, म्हणूनच की काय, पठ्ठे बापूराव म्हणतात, मुंबई ग नगरी सदा तरनी.
यानंतर मुंबई आहे तशीच राहते चिरतरूण. पण यात सर्वात आधी नुकसान होतं, ते मुंबईत राब राब राबणाऱ्या मजुरांचं, कामगारांचंच...म्हणूनच बॉलीवूडचं जुनं गाणं, मुंबईकरांना सावध राहण्याविषयी सांगतंय, ऐ दिल जिना है मुश्कील यहाँ, जरा हटके, जरा बचके, ये हे बॉम्बे मेरी जान...!