डिजिटायझेशनचा नातेसंबधांवर परिणाम, मिठी मारण्याची भावना व्हिडिओ कॉलमध्ये कुठे?

डिजिटायझेशनने जग जवळ आले असले तरी नाती मात्र दुरावत आहेत.

पोपट पिटेकर | Updated: Oct 7, 2022, 11:14 PM IST
डिजिटायझेशनचा नातेसंबधांवर परिणाम, मिठी मारण्याची भावना व्हिडिओ कॉलमध्ये कुठे? title=

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : भारत हा पारंपारिक वारसा आणि आधुनिक आस्थापनांचा सुंदर मिलाफ आहे. भारत हा सर्वात मोठी तरुण लोकसंख्या असलेल्या वाढत्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. डिजिटल क्रांतीने समाजाचा चेहरामोहरा बदलण्याच्या विविध संधी येथे उपलब्ध आहेत. आपण सर्व कामांसाठी डिजिटल माध्यमावर अवलंबून आहोत. शिक्षण, प्रसारमाध्यमे, आरोग्य, व्यापार, वाणिज्य, असे अनेक क्षेत्रावर डिजिटलायझेशनचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे.

आजचं डिजिटल युग

आपण ज्या युगात जगत आहोत त्याला डिजिटल युग म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. डिजिटायझेशनचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. कारण कोणतही अवघड कामे हे आपण डिजिटलमुळे सहज करु शकतो. डिजिटल तंत्रज्ञानाने समाजाची कार्यशैली अनेक पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात बदली आहे. इंटरनेट मीडियाचे विविध प्लॅटफॉर्म वापरताना आपल्याला आनंद आणि अभिमानही वाटतो. परंतू त्या डिजिटलचा आपल्या संवेदना, भावना आणि संस्कार यांच्यावर  परिणामही झालेला दिसून येतो.

डिजिटल माध्यम आणि संवाद

आजच्या युगात आपला मेंदू हा यंत्राप्रमाणे काम करतो. डिजिटलमुळे आपला संवाद फास्ट होतो. परंतू त्यात आपुलकी, प्रेम, भावना असतात का हा खरा प्रश्न आहे. समोर असल्यावर जे बोलताना आपुलकी असते ते डिजिटल माध्यामातून दिसून येईलच असं नाही. जेव्हा एखादा शिक्षक विद्यार्थ्यावर संस्कार करत असताना त्या विषयाकडे आपले लक्ष वेधून घेतो, त्या वेळी शिक्षकाच्या शब्दांच्या उच्चारासोबतच त्याचे हावभाव विद्यार्थ्याच्या मनावर छाप सोडतात. त्याचा परिणाम केवळ अभ्यासावरच नाही तर वागणूक आणि जीवनावरही तितकाच प्रभावी होतो.

डिजिटल शिक्षण आणि संस्कृती

विद्यार्थीं हा गुरूच्या ज्ञानात्मक, भावनात्मक आणि विचारात्मक या तीन प्रकारच्या प्रभावाने प्रभावित होऊन सुसंस्कृत बनतो. परंतू डिजिटल माध्यमाच्या शिक्षणाचा आपल्या संस्कारांवर काही प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो. गुरूचे मार्गदर्शन मिळाल्याशिवाय विद्यार्थी डिजिटल माध्यमाच्या शिक्षणाने डॉक्टर किंवा इंजिनिअर होऊ शकतो. पण तो सुसंस्कृत माणूस होऊ शकत नाही. ज्याच्याकडे संस्कृती नसेल, तो खऱ्या अर्थाने माणूसही बनू शकणार नाही.

प्राणी, पक्षी, आणि मनुष्य

प्राणी आणि पक्षी हे ज्ञानी आहेत. परंतू ते मनुष्यासारखे क्रियाशील नाहीत. आपलं डिजिटल ज्ञानही तसेच आहे. केवळ शिक्षणातच नाही तर सामाजिक क्षेत्रातही आपापसातील विचारांची देवाणघेवाण एकमेकांच्या जवळ राहूनच होऊ शकते, ते डिजिटल माध्यमातून शक्य नाही.

व्हिडिओ कॉलिंग आणि मिठी मारणे यात फरक

आपण या डिजिटल युगात व्हिडिओ कॉलिंगद्वारे आपल्या कुटुंबाशी किंवा मित्रांशी संपर्क साधतो. परंतू त्यांना आपण प्रेमाने मिठी मारू शकत नाही, त्यांच्या जवळ बसू शकत नाही. एखाद्या गायकाच्या त्याच्या गाण्याच्या आवाजाने जे प्रत्यक्ष प्रभाव त्याच्या समोर बसून पडू शकतो. तो प्रभाव VIDEO LIVE ने पडेल का हा खरा प्रश्न आहे.

गणितासाठीही डिजिटलचा वापर

आपण साध्या गुणाकारासाठी देखील कॅल्क्युलेटर, मोबाईल, टॅब इत्यादी डिजिटल साधनांवर अवलंबून आहोत. हे किती गंभीर आहे की जिथे आपले पूर्वज हाताच्या बोटांवर मोठी गणना करायचे तिथे आज आपण साध्या बेरीज-वजाबाकीसाठीही डिजिटल माध्यमाची मदत घेत आहोत. ही प्रथा आपल्या जीवनातील मूलभूत गुण टिकवून ठेवण्यासाठी हानिकारक ठरवू शकतो.

आपण बौद्धिक असले पाहिजे, यांत्रिक नाही

डिजिटल असणे ही चांगली गोष्ट आहे. पण स्वतःची शक्ती आणि क्षमता विसरून पूर्णपणे डिजिटल माध्यमांवर अवलंबून राहणे ही आपली मोठी चूक आहे. ही सवय सुधारायला हवी. आपण बौद्धिक असले पाहिजे, यांत्रिक नाही. यासाठी आपल्याला आपल्या शक्तीचा आणि सामर्थ्याचा वापर करावं लागेल. तसेच आपल्याला व्यावहारिक बनावे लागेल.

डिजिटलचा आतिवापर

डिजिटल माध्यमाचा आपल्या संस्कृतीवर, संस्कारांवर, संवेदनशीलतेवर आणि शक्तीवर परिणाम होणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. आपण डिजिटल माध्यमांचा अवलंब करतो पण त्याला आपली सवय बनवत नाही. केवळ डिजिटल माध्यमाच्या सवयीपासून मुक्ती केल्यानेच मानवाची सर्जनशीलता, कलात्मकता आणि क्रियात्मकता खऱ्या अर्थाने फुलताना दिसेल.