आणि आई बाप अमेरिकेला गेले...!

अमेरिकेला जायचं अनेकांचं स्वप्न असते ...बऱ्याच जणांचे ते पूर्ण होते तर बऱ्याच जणांचे ते पूर्ण होत नाही.. असे असले तरी अमेरिकेला जाणे आता आधी सारखे 'ग्लॅमरस' राहिले नाही..! मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आई बाप अमेरिकेला गेले हे हेडिंग कसे काय... ते ही बरोबर च आहे म्हणा... ज्यांनी खूप कर्तृत्व गाजवलं अश्याच व्यक्तींच्या आई वडीलां बद्दल लिहलं जाते... त्या तुलनेने आम्ही छोटे आणि कसले ही कर्तृत्व नसलेलेच... पण तरी ही एकूण सामाजिक दृष्टीने आमचे आई बाप अमेरिकेला जाणे हे विशेष नसले तरी ज्यांच्या प्रचंड मेहनती मुळे किमान पायावर उभा राहू शकलेल्या माझ्या सारख्या मुलाला त्याचे कौतुक आहे म्हणूनच हा प्रपंच....!

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 30, 2017, 06:08 PM IST
आणि आई बाप अमेरिकेला गेले...! title=

कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड  : अमेरिकेला जायचं अनेकांचं स्वप्न असते ...बऱ्याच जणांचे ते पूर्ण होते तर बऱ्याच जणांचे ते पूर्ण होत नाही.. असे असले तरी अमेरिकेला जाणे आता आधी सारखे 'ग्लॅमरस' राहिले नाही..! मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आई बाप अमेरिकेला गेले हे हेडिंग कसे काय... ते ही बरोबर च आहे म्हणा... ज्यांनी खूप कर्तृत्व गाजवलं अश्याच व्यक्तींच्या आई वडीलां बद्दल लिहलं जाते... त्या तुलनेने आम्ही छोटे आणि कसले ही कर्तृत्व नसलेलेच... पण तरी ही एकूण सामाजिक दृष्टीने आमचे आई बाप अमेरिकेला जाणे हे विशेष नसले तरी ज्यांच्या प्रचंड मेहनती मुळे किमान पायावर उभा राहू शकलेल्या माझ्या सारख्या मुलाला त्याचे कौतुक आहे म्हणूनच हा प्रपंच....!

गेली तीन वर्ष माझ्या भावाने अथक प्रयत्न केल्या नंतर अखेर आई वडीलांना अमेरिकेचा व्हिसा मिळाला आणि मी त्यांना सोडायला एअरपोर्ट वर गेलो..तोपर्यंत सगळे ठीक होते..! सहज म्हणून पाया पडायला वाकलो आणि कारण नसताना डोळ्यातून पाणी आले..! आई बाबा एअर पोर्ट च्या आत गेले आणि अचानक पणे आता पर्यंत च्या आयुष्याचा पट डोळ्यासमोरून सरकला... तो सरकत असतानाच वाटले आपण आई वडिलांचे कष्ट किती सहज घेत होतो...वडील... अगदी साधे... काही वर्षांतच त्यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवलेले...! दोन भाऊ वडील आणि तीन बहिणी अस मोठे कुटुंब...! न कळत्या वयातच जबाबदारी अंगावर पडलेली.. पडेल ते काम करत कसे तरी घेतलेले जुजुबी शिक्षण...परिस्तिथीची जाणीव लहानपणीच झाल्याने पैश्यांची किंमत कळलेली.. कसली हौस नाही, मौज नाही...! बहिणींची लग्ने करून दिली... त्यांचे ही लग्न झाले...मग पडेल ते काम करत सुरु झाला संसाराचा गाडा ओढणे...!

 वडिलांचे लग्न आणि इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये नोकरी हे एकाच वेळी झाले असले तरी पगार मात्र अत्यल्प...संसाराचा गाडा तर ओढायचाय... मग करायचे काय या विचारातच घरी मेस सुरु करण्याचा निर्णय..! ते कमी की काय म्हणून घरी एक म्हैस ही घेतली..! मग काय वडिलांबरोबर आमच्या आईच्या ही कष्टची परिसीमा...! एकीकडे इरिगेशन डिपार्टमेंट ची कामे प्रचंड असल्याने मेस ला अनेकांची गर्दी...! पण बहुतेक जण वडिलांच्या वरच्या हुद्द्याचे असल्याने बहुतेक वेळा पैसेच नाहीत आणि दिलेच तर निम्मे आणि पैसे न देता निघून गेलेल्यांची संख्या तर न सांगितलेलीच बरी...! मग काय मेस च्या व्यवसायाचे जे व्हायचे तेच होणार...! पण तरी ही तोट्यात का असेना व्यवसाय सुरु...आईचे बाळंतपण झाले तरी मेस सुरूच..! एकीकडे मुले सांभाळायची दुसरीकडे मेस ला गर्दी...! असाच संसाराचा गाडा ओढत असताना आम्ही तीन भावंडं आणि एक बहीण असा संसार उभा राहिला...एकीकडे परिस्थिती हलाखीची आणि दुसरीकडे संसार मोठा...पण आई वडिलांचे केवळ कष्ट आणि कष्ट याच्या जीवावर संसाराचा गाडा हाकने सुरु...! ते कष्ट खरेच शब्दात व्यक्त करता येणारे नाही...! ती दृश्य डोळ्यासमोरून जाताना कमालीची अस्वस्तथा आज ही अनुभवता येते. अर्थात मी काही भावनांचे भांडवल करण्यासाठी लिहीत नाही पण ज्याला ग्रामीण भागाची आणि तिथल्या राहणीमानाची कल्पना आहे त्याला त्याची जाणीव नक्की होईल..

 अर्थात परिस्तिथी किती ही हलाखीची असली तरी आपली मुले आपल्या साहेबांसारखी मोठी व्हावीत या आशेने आई वडिलांनी आम्हाला चांगल्या शाळेत घातले... अर्थात ठराविक अंतराने आम्ही चार ही भावंडे शाळेत जाऊ लागल्याने शाळेची फी पुस्तकांचा खर्च हे आवाक्या बाहेरचे. पण नोकरी चे काम करून आल्यानंतर पडेल ते काम करून आई वडिलांनी ते ही भागवले...! आई वडिलांचे कष्ट म्हणा किंवा आणखी काही मी वगळता माझे सर्व भावंडे अभ्यासात हुषार निघाली.... थोरल्या भावाने व्यवसाय सुरु केला... त्याचे व्यवस्तिथ झाले...! पण तरी ही परिस्थिती खूपच बदलली अस नव्हत..मधवा भाऊ कॉलेजला गेला...! त्याने डॉक्टर इंजिनिअर व्हावे असं वाटत असताना आणि आय टी ची बूम नसताना भावाने आय टी क्षेत्र निवडले ... प्रचंड तणाव झाला पण पोरगं काही तरी चांगले करेल या आशेवर त्यांनी परवानगी दिली. भावाने ही ती आशा पूर्ण केली चांगली नोकरी मिळाली आणि काही वर्षे झाले तो अमेरिकेत गेला... वाया गेलेल्या आम्ही ही रडत खडत पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला आणि सुरुवातीला ई टी व्ही आणि जवळपास ६ वर्ष झाली झी २४ तास मध्ये काम करतोय... याच प्रवासात आई वडिलांनी केलेल्या कष्टामुळे आम्ही तीन भाऊ स्वतःच्या पायावर उभे राहिलो... या प्रवासात केवळ पुणे हेच सर्वात मोठे शहर माहीत असलेल्या आमच्या आई वडिलांनी अमेरिकेला यावे म्हणून अमेरिकेतल्या भावाने अट्टाहास धरला. किती तरी दिवस नको नको म्हणणाऱ्या आई वडिलांनी अखेर होकार दिला. इंग्लिश तर सोडाच पण हिंदी ही अडखळत बोलणाऱ्या आमच्या आई वडिलांचा व्हिसा मंजूर झाला आणि ते अमेरिकेला गेले सुद्धा...

 अर्थात खूप लिहिण्यासारखे आहे, खूप सांगण्यासारखे आहे पण विनाकारण कारुण्य नको आहे. आणि ज्या आई वडिलांनी आयुष्य भर खस्ता खाल्लेल्या असतात आणि त्यांच्या या कष्टामुळे मुले स्वतः च्या पायावर उभी असतात त्या सर्वांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि आई वडिलांचे आभार मानण्यासाठी केलेला हाः छोटासा प्रयत्न...! त्याच्यामुळं तात्विक अर्थाने आम्ही खूप कर्तृत्ववान नसलो तरी आमचे आई बाप अमेरिकेला गेले याचा आम्हाला अभिमान नक्कीच आहे...!