विठ्ठल, वारी आणि मी...! पंढरीची वारी कव्हर करताना

श्रीकांत घुले, झी मीडिया, प्रतिनिधी : एवढ्या वारकऱ्यांचा अवघा रंग ‘एक’ होतो कसा, लाखो वारकरी इतक्या दुरून पायी कसे चालत येत असतील. यासह इतर अनेक प्रश्नांची उत्तरं वारी कव्हर करताना मिळाली. वारी कव्हर करताना आलेला अनुभव तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न.

Updated: Jul 22, 2024, 11:05 PM IST
विठ्ठल, वारी आणि मी...! पंढरीची वारी कव्हर करताना title=

श्रीकांत घुले, झी मीडिया, प्रतिनिधी : वर्षानुवर्षे अव्याहतपणे चालत आलेली महाराष्ट्राची एक गौरवशाली परंपरा म्हणजे वारी...वारीचे ते 20-22 दिवस मंतरल्यासारखे होते. काही गोष्टी ऐकून अनुभवता येत नाहीत, त्या जगाव्याच लागतात असं म्हणतात हे अगदी खरं आहे. वारी त्यापैकीच एक सोहळा. पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलासाठी लोक इतके का वेडे आहेत, याचं उत्तर वारीत मिळतं. पहाटे 4 वाजता उठण्यापासून वारकऱ्यांचा दिवस सुरू होतो. उजाडण्याच्या आत अंघोळ आवरून घ्यायची आणि सकाळचा चहा घेऊन पुढच्या प्रवासाला निघायचं. अभंग, भजन म्हणत अखंड पायी चालायचं. वाटेतच नाश्ता आणि जेवण करायचं. थोडासा विसावा घेऊन पुन्हा चालायचं. रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचं. तिथं कीर्तन झाल्यावर जेवण करून मिळेल त्या जागी झोपी जायचं. असा साधारण वारकऱ्यांचा दिनक्रम असतो.

कोरोनात वारकऱ्यांना घराबाहेर पडता आलं नाही. त्यामुळं यंदाच्या वारीला प्रचंड गर्दी होती. अगदी 5-6 वर्षांच्या मुलांपासून ते 108 वर्षांच्या जख्खड म्हाताऱ्यापर्यंत सगळेजण वारीत भेटतात. यंदा पेरणी लवकर आटोपल्यामुळेही शेतकरी मोठ्या संख्येनं वारीला आले होते. संपूर्ण कुटुंबं पायी वारीसाठी आली होती. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी वारीला व्यापून टाकतात. सगळ्यात जास्त वारकरी याच भागातले भेटले. वारीत सगळ्यात जास्त आनंदी दिसतात त्या माया-माऊल्या. वर्षभर शेतात, घरात राबराब राबून सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर हसू फुलल्यानं म्हातारे-म्हाताऱ्या लैच गोड दिसू लागतात. 

वर्षभर घरात बसून राहिलेल्या गावच्या म्हाताऱ्यांसाठी वारीपेक्षा मोठा दुसरा उत्सव नाही. बँकेत सही-शिक्का मारण्यासाठी कधीतरी गावच्या म्हाताऱ्यांना तालुक्यापर्यंतची वारी घडते. कधी काही दुखलं-चुकलं तर डॉक्टरची भेट होते. पण मौज म्हणून त्यांची ट्रीप नाही निघत कधी. तुलनेत शहरातले म्हातारे-म्हाताऱ्या गार्डनमध्ये वॉक करण्यापासून हास्यक्लबचे मेंबर्स असतात. वीकएंडला मॉलमध्येही चक्कर टाकतात. हे गावच्या लोकांच्या नशीबी नाही. त्यामुळं गावखेड्यातील म्हाताऱ्या बायबापड्यांना वारीसारखा आनंदसोहळा दुसरा वाटत नाही. फुगडी खेळून, गौळणी अभंग गाताना, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन झपाझपा चालणाऱ्या मायामाऊलींच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची तुलना नाही करता यायची. वारीत असताना ही लोकं अनेकांशी आयुष्यभराची नाती तयार करतात. जवळपास महिना दीड महिना घराबाहेर असलेले वारकरी एकमेकांचे जीवाभावाचे नातेवाईक बनतात. आपली सुखदु:ख एकमेकांना सांगून मनं हलकी करतात. सुनबाईंच्या किरकिऱ्यांपासून घरातल्या नातवंडांपर्यंतच्या गोष्टी यांच्यात रंगतात.

ऊन, वारा किंवा पावसाची काहीच फिकीर नसल्यागत ही मंडळी चालत असते. पाऊस जोरात आलं की थोडं कुठंतरी आडोश्याला थांबायचं, पाऊस थोडा ओसरला की लगेच ग्यानबा तुकारामचा गजर करत चालायला लागायचं. चिखलात बसून जेवताना मी अनेकांना बघितलं. पंढरीच्या पांडुरंगाची इतकी कमालीची ओढ आपल्याला अवाक् करून टाकते. दिवसभर चालून देखील ही लोकं थकत नाहीत, त्यांचे पाय दुखत नाहीत, त्यांना थकवा वाटत नाही. उलट चालून आलेल्या थकवा घालवण्यासाठी फुगडी खेळतात, डान्स करतात, भजनं गातात. विठ्ठलाच्या नामस्मरणात कुठलंच संकट हे संकट वाटत नाही. देहभान विसरून, सगळी सुखदुख विसरून ही मंडळी चालत असते. इथं सगळे माऊली-माऊली म्हणून एकमेकांना हाक मारतात. लहान-मोठा भेद न करता एकमेकांच्या पाया पडतात. वारीत सगळे समान आहेत. श्रीमंत-गरिबामधली दरी इथं संपुष्टात येतात. श्रीमंत आणि गरीब इथं एकाच रेषेत असतो. उच्च-नीच असा कुठलाच भेद इथं चालत नाही. वारीत कधीच कुणी कुणाला धर्म विचारत नाही. सगळ्या जातीधर्म, पंथाचे लोक विठ्ठलाच्या भेटीसाठी सोबत जातात. वारीचं कुणाला निमंत्रण दिलं जात नाही. याची कुठली निमंत्रण पत्रिकाही छापली जात नाही. पण तरीदेखील लाखोंच्या संख्येनं लोक एकत्र येतात. जगाच्या पाठीवर कदाचित असं दुसरं उदाहरण असेन.

आषाढी पायी वारी सोहळ्यात महाराष्ट्रातल्या शेकडो संतांच्या पालख्या असतात. पण तुलनेनं सर्वाधिक गर्दी माऊलींच्या अर्थात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत दिसते. माऊलींच्या पालखी रथासमोर आणि रथामागे मानाच्या दिंड्या चालत असतात. अर्थात ज्याची नोंद आळंदी संस्थानकडे आहे. माऊलींच्या रथासमोर जवळपास २७ आणि रथामागे ३५० हून अधिक मानाच्या दिंड्या चालतात. याव्यतिरिक्त ज्यांची अधिकृत नोंदणी नाही अशा शेकडो दिंड्या पायी वारीत असतात. प्रत्येक दिंडीला दिंडी प्रमुख असतो. याशिवाय अनेक फडकरी असतात. ज्यांच्या अखत्यारित ठराविक दिंड्या येतात. फडकऱ्यांचा शब्द हा दिंडीसाठी अंतिम असतो. फडकऱ्यांनी घेतलेली भूमिका दिंड्यांची भूमिका समजली जाते. माऊली आणि तुकोबांच्या पालखीसोबत चोपदार असतात. विशिष्ट घराण्यांना हा मान असतो. वारीमधली विसाव्याची आणि रात्रीच्या मुक्कामाची ठिकाणं आधीच ठरलेली असतात. एवढा मोठा सोहळा होतो पण कुठंही ढिसाळपणा किंवा नियोजनाचा अभाव दिसत नाही. अगदी शिस्तबद्धपणे संपूर्ण सोहळा पार पडतो. जवळपास महिनाभराचा पायी प्रवास असल्यानं वारकऱ्यांचं भक्तीरसासोबतच मनोरंजन व्हावं या हेतूने रिंगणासारखे सोहळे असतात. रिंगणाचेही दोन प्रकार असतात. उभं रिंगण आणि गोल रिंगण. रिंगण म्हणजे पालखीसोबत जे मानाचे अश्व पंढरपूरपर्यंत निघालेले असतात त्यांची प्रदक्षिणा. मानाचे अश्व धावून हे रिंगण पूर्ण करतात. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी एकत्र येतात. रिंगणात २ अश्व धावतात. एका अश्वावर मानाचे स्वार असतात तर दुसऱ्या अश्वावर संतांची गादी असते. माऊलींच्या रिंगणात माऊलींची तर तुकोबांच्या रिंगणात तुकोबांची गादी. अश्वांनी धावून रिंगण पूर्ण केल्यानंतर तिथली माती वारकरी आपल्या कपाळावर लावतात. अनेक जण ती माती सोबत नेऊन आपल्या शेतातही टाकतात. पीक जोमाने येतं, अशी त्यांची भावना असते.

पंढरीच्या वारीला साधारण 1 हजार वर्षांचा इतिहास असल्याचं म्हणतात. खरंतर त्याही आधीपासून वारीची परंपरा सुरू आहे. नामदेव महाराजांनी पायी वारीची सुरुवात केल्याचे दाखले दिले जातात. तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन एकत्रितपणे त्यांनी वारीची सुरुवात केली होती. नंतर 1832पासून हैबतबाबांनी तुकोबा आणि माऊलींची पालखी स्वतंत्रपणे सुरू केली. तेव्हापासून देहूतून तुकोबांची तर आळंदीतून माऊलींची पालखी पंढरीसाठी मार्गस्थ होते. मग हळूहळू राज्यातल्या इतर संतांच्याही पालख्या स्वतंत्रपणे निघायला सुरुवात झाली. 

मी ऑन कॅमेरा आणि ऑफ कॅमेरा अनेकांना विचारलं, वारीची ही परंपरा कधीतरी थांबेल असं वाटतं का, त्यावर एकजात सगळ्यांचं उत्तर होतं, शक्यच नाही. महाराष्ट्राच्या मातीत वारी आहे. इथल्या संस्कृतीत वारी आहे. जोवर महाराष्ट्र आहे तोवर वारी आहे. महाराष्ट्राला समृद्ध अशी संतांची परंपरा आहे. हेच महाराष्ट्राचं वेगळेपण आहे. संतांनी महाराष्ट्राला सामाजिक समरसतेचा संदेश दिला. म्हणूनच माऊलींची वारी जेजुरीमार्गे जाते. जेजुरीत शैव आणि वैष्णवांचा मिलाप होतो. शैव आणि वैष्णवांमधला वाद मिटवून आपण एकच आहोत हा संदेश देण्यासाठी संतांनी प्रयत्न केले.

इतकं पायी चालल्यानं पाय दुखत नाहीत का?, हा प्रश्न मी शेकडो वारकऱ्यांना विचारला असेन. पांडुरंग बोलावतो, तो सगळं करून घेतो, हेच सगळ्यांचं उत्तर होतं. ज्या देवाच्या हातात कुठलंही शस्त्र नाही, जो देव कोणावर कोपत नाही, जो देव नवसाला पावत नाही, ज्या देवाला कसलाही विटाळ नाही, ज्या देवासाठी कुठलेही नियम-अटी नाहीत, त्याच विठ्ठलासाठी देहभान विसरून वारकरी पंढरीला जातात. बरं, पंढरीला गेलेल्या प्रत्येकाला विठ्ठलाचं दर्शन होतं का...तर अर्थातच नाही. मोजून १० टक्के लोकांना गाभाऱ्यात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेता येत असेल. मग महिनाभर घरदार सोडून आलेले वारकरी दर्शन न घेताच परत माघारी फिरूनही आनंदी कसे असतात? विठोबाच्या मंदिराचा कळस दिसला म्हणजे विठोबा दिसला, इतका उदात्त विचार वारकऱ्यांचा आहे. कळसाचं दर्शन घेऊन चंद्रभागेत स्नान करून वारकरी हसतमुखाने माघारी फिरतो. देवामध्ये आणि आपल्यात वारकऱ्याला कुण्या मध्यस्थाची गरज नाही. कळसाला डोळेभरून पाहून वारकरी परतीच्या प्रवासाला लागतात. इतकं सहज, निरागस दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग. बरं, विठ्ठलाला माऊली अर्थात आई म्हटलं जातं. आपल्या देवाला आई म्हणण्याचं हे उदाहरणही दुर्मिळच.

मी ऑफ कॅमेरा अनेक वारकऱ्यांशी भरपूर गप्पा केल्या, त्यांच्यासोबत चाललो. जेवलो, फुगड्या खेळलो. आयुष्यभर पुरणारा ठेवा घेऊन परतलोय. आपल्यात सतत सुरू असणार्‍या मानसिक द्वंदाला क्षणात संपवण्याची ताकद वारीत आहे. खऱ्या महाराष्ट्राचं दर्शन वारीनं घडवलं. २० दिवसांची ऊर्जा स्वत:च्या आतमध्ये साठवून ठेवलीय. पुढचं वर्षभर पुरेल इतकी ताकद त्यात आहे. भेटू, पुढच्या वर्षी.

राम कृष्ण हरी !!!