संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न; वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की...

Sant Tukaram Maharaj Palkhi: तुकोबांची पालखी मध्यभागी ठेवण्यात आल्यानंतर दिंडीतले मानकरी, झेंडेकरी, पताकाधारी आणि महिला वारकरी यांनी पालखीला प्रदक्षिणा घातली. यावेळेस मानाच्या अश्वाने रिंगण पूर्ण केल्यानंतर अश्ववांच्या टापा खालची माती उचलण्यासाठी एकच गर्दी झाली.

Updated: Jun 20, 2023, 11:02 AM IST
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न; वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की... title=
बेलवडी इथं संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न

- जावेद मुलाणी/ विशाल सवने 

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 338 वा पालखी सोहळा सुरू आहे. काल काटेवाडी इथं मेंढ्यांचे रिंगण झाल्यानंतर आज (20 जून 2023 रोजी) बेलवडी इथं संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न झाले. (रिंगण सोहळ्याचे फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिंडीत पहिल्यांदाच असं घडलं

संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सणसरहून अथुर्णेकडे मार्गस्थ होत असताना वाटेत बेलवडी या गावात महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण मोठ्या उत्साहात संपन्न झालं. यावेळी महाराजांची पालखी रिंगण स्थळी आल्यानंतर पालखी खांद्यावर घेऊन मानकर यांनी पालखीला रिंगण दाखवलं. त्यानंतर तुकोबांची पालखी मध्यभागी ठेवण्यात आली. त्यानंतर मेंढ्यांनी पालखीची प्रदक्षिणा पूर्ण केली. इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांनी देखील पालखीला प्रदक्षिणा घातली. यावेळी डीवायएसपी गणेश इंगळे यांनी पोलीस आणि सामान्य जनता यामध्ये अंतर कमी करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचा म्हटलं. पोलिसांच्या प्रदक्षिणेनेनंतर अनुक्रमाने दिंडीतले मानकरी, झेंडेकरी, पताकाधारी आणि महिला वारकरी यांनी पालखीला प्रदक्षिणा घातली.

मानाच्या अश्वांची दौड

रिंगण सोहळ्यामध्ये मुख्य आकर्षण असतं ते मानाच्या अश्वांनी घेतलेल्या दौडीचं. यावेळी मानाच्या अश्वांनी पालखीला 5 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर अश्वांच्या टापांखालची माती उचलण्यासाठी वारकऱ्यांनी एकच गर्दी केली. अश्ववांच्या टापा खालची माती एरवी माती असते. मात्र ही माती रिंगणानंतर प्रसाद होऊन जाते. टापांखालची माती आपल्या शेतामध्ये टाकल्यानंतर पीक भरघोस येतं अशी वारकऱ्यांची धारणा आहे.

पाहा फोटो >> अश्वांची दौड, टापांखालच्या मातीसाठी गर्दी अन्...; तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रिंगण सोहळ्याचे खास फोटो

अकलूजमधून मानाचा अश्व

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला जे मानाचे अश्व आहेत ते अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून अर्पण केले जातात.