भारतीय हवाईदलाने हल्ला केलेल्या बालाकोटमधून झी मीडियाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट

एअर स्ट्राईकचे पुरावे मागत असलेल्या लोकांसाठी झी मीडियाचा हा एक्सक्लुझिव रिपोर्ट

Updated: Mar 4, 2019, 04:37 PM IST
भारतीय हवाईदलाने हल्ला केलेल्या बालाकोटमधून झी मीडियाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट title=

मुंबई : ज्या देशवासियांना आपल्या लष्करावर विश्वास नाही त्यांचे डोळे उघडणं खूप कठीण आहे. मात्र जैशच्या बालेकिल्ल्यात शिरून झी मीडियाने वार्तांकन केलं आहे. बालाकोट येथे झालेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे तुमच्यासमोर येणार आहेत. झी मीडिया तुम्हाला बालाकोटमध्ये अशा ठिकाणचे दृष्य दाखवत आहे जिथे भारताने हवाई हल्ला करून दहशतवाद्यांच्या कबरी खणल्या.

बालाकोटपासून जवळच २४ किलोमीटरवर असलेला जब्बा टॉप. इथे मसूद अझर मदरसा चालवत होता. जब्बा टॉपवर जाण्यासाठी २ रस्ते आहेत. प्रस्तररोहण करून किंवा गाडीत बसून अशा दोन्ही प्रकारे जब्बा टॉपवर जाता येतं. झी मीडियाची टीम चालतच जब्बा टॉपवर जायला निघाली. रस्त्यात ठिकठिकाणी पाकिस्तानी आर्मीचे जवान उभे होते. मात्र थोड्याच अंतरावर रस्ता बंद केला होता. त्यामुळे नेहमीच्या रस्त्याने येणं भाग पडलं. 

झी मीडियाच्या धाडसी पत्रकाराचा आम्ही तुम्हाला चेहरा दाखवू शकत नाही. त्याचं नावही सांगणार नाही. कारण या वार्तांकनानंतर त्यांच्या जिवाला धोका आहे. मात्र बालाकोटमध्ये त्यांनी काय पाहिलं, त्यांच्या कॅमेऱ्यातून काय काय चित्रीत झालं, कॅमेरा बंद झाल्यावर तिथल्या स्थानिकांनी काय सत्य सांगितलं आणि पाकिस्तानी आर्मीने चित्रीत केलेलं फुटेज का डिलीट करायला लावलं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

वाटेत जागोजागी पाकिस्तानी आर्मीचे जवान आमच्या प्रतिनिधीचं ओळखपत्र तपासत होते. एखादं चुकीचं पाऊल आणि थेट जीवच गेला असता. बालाकोटच्या या संपूर्ण परिसराला लष्करी छावणीच स्वरूप आलं आहे. इथे नेमकं काय झालं याचा अंदाज यातूनच येईल. हवाई हल्ल्याने झालेलं नुकसान इथे जागोजागी दिसून येतं आहे. 

अखेरीस जिथे हवाई हल्ल्याने जैशच्या तळाचं नुकसान झालं तिथे आम्ही पोहोचलो. परिसरात काही कच्चं बांधकाम असलेली घरं दिसून आली. घरांना तडे गेले होते. मोठं नुकसान झालं होतं. २६ फेब्रुवारीला रात्री बालाकोटमध्ये वायुसेनेनं काय केलं हे स्थानिक सांगत आहेत.

पाकिस्तानी आर्मीने जी जागा दाखवली तिथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. मात्र या टेकडीच्या माथ्यावर जिथे हा दहशतवादी तळ होता तिथे मात्र जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. मात्र इथे रस्त्यात जागोजागी बॉम्बचे तुकडे दिसून आले. एकूणच पाकिस्तानी लष्काराने झी मीडियाचं चित्रीकरण मोठ्या प्रमाणात का डिलीट केलं. टेकडीच्या माथ्यावर जाण्यास का अनुमती नाकारली. या प्रश्नातूनच बालाकोटमध्ये नक्की काय झालंय याचा अंदाज तुम्हाला येईल.