महिलेच्या डोक्यात सापडला जिवंत वळवळणारा किडा; रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकीत, जगातील पहिलीच केस

Worm Living In Woman Brain: महिलेला गेल्या कित्येक दिवसांपासून ताप आणि सुखा खोकला येत होता. महिलेचे MRI स्कॅन करताच समोर आले भयानक सत्य 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 29, 2023, 01:22 PM IST
महिलेच्या डोक्यात सापडला जिवंत वळवळणारा किडा; रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकीत, जगातील पहिलीच केस title=
worm living in woman brain world first case discovered by doctors know symptoms in marathi

Worm Living In Woman Brain: एका 64 वर्षांच्या महिलेच्या डोक्यातून जिवंत किडा बाहेर काढण्यात आला आहे. जगातील ही पहिलीच घटना असून या घटनेमुळं वैदयकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरही या घटनेमुळं आश्चर्यचकित झाले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून महिला निमोनिया, पोटदुखी, कोरडा खोकला, ताप आणि रात्री भयंकर घाम येणे अशी लक्षणे दिसत होती. डॉक्टरांनी 2021पासूनच डॉक्टर स्टेरॉइड आणि अन्य औषधांनी तिच्यावर उपचार करत होते. 

2022मध्ये महिलेमध्ये डिप्रेशन आणि गोष्टी विसरण्याचे लक्षणेदेखील दिसत होते. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या डोक्याचा MRI स्कॅन करण्याचा निर्णय घेतला मात्र, जेव्हा त्याचे रिपोर्ट आले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिनच हादरली. महिलेचे रिपोर्ट सामान्य नव्हते. त्यामुळं डॉक्टरांनी तिची सर्जरी करण्याची सल्ला दिला. 

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माबितीनुसार, कॅनबरा येथील रोग विशेषज्ञ डॉ. संजय सेनानायके यांनी म्हटलं आहे की, न्यूरोसर्जन यांनी सर्जरी न करण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्यांना कळलं की, महिलेच्या मेंदूत एक जिवंत किडा आहे. हे जगातील पहिलेच प्रकरण आहे. त्यामुळं डॉक्टरही आश्चर्यचकित झाले होते. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या मेंदूत असणारा किडा हा 3 इंच लांब असा पॅरासाइट राउंडवॉर्म होता. वैदयकीय भाषेत याला ओफिडास्करिस रोबर्टसी नावाने ओळखले जाते. हा किडा महिलेच्या डोक्यात जिंवत होता. अशा प्रकारचे किडे हे सापाच्या शरीरात आढळले जातात त्यामुळं माणसाच्या शरीरात हा किडा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

राउंडवॉर्म हा किडा विशेष करुन कार्पेट पायथंस या सापाच्या प्रजातीमध्ये आढळला जातो. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि पापुआ न्यू गिनीमध्ये आढळले जातात. 

डॉक्टरांनी याबाबत महिलेची चौकशी केली असती तिने म्हटलं की, तीच्या घराच्या परिसरात अनेकदा साप आढळतात. त्यामुळं डॉक्टरांनी असा तर्क लावला आहे की, पालक किंवा एखादी पालेभाजीसारख्या गोष्टीवर या किड्याची अंडी असतील आणि महिलेने अनावधानाने ही भाजी खाल्ली असेल. त्यामुळं तिच्या शरीरात हा जिवंत किडा सापडला असेल. 

दरम्यान, डॉक्टरांनी या महिलेवर उपचार सुरू करण्यापूर्वी अनेक महिने तिला निगराणीखाली ठेवले होते. या महिलेला काळजीपूर्वक औषधे देण्यात आली होती. या महिलेची प्रकृती आधीपेक्षा खूपच व्यवस्थित आहे. मात्र, काही लक्षणे अजूनही जाणवतात. न्यूरोसर्जन अजूनही नियमितपणे तिच्या डोक्याचे स्कॅन आणि त्यातील संक्रमण याचा तपास करतात, असं डॉक्टर सेनानायके यांनी म्हटलं आहे.