डर के आगे जीत है! जगातील फक्त 50 वैमानिकच या विमानतळावर करु शकतात लँडिंग, पण असं का?

Travel News : खतरों के खिलाडी... प्रत्यक्षात अनुभवायचं असेल तर, एकदा या विमानतळावर होणारं लँडिंग नक्की अनुभवा... सगळंच विसरून जाल!  

सायली पाटील | Updated: Sep 23, 2024, 03:38 PM IST
डर के आगे जीत है! जगातील फक्त 50 वैमानिकच या विमानतळावर करु शकतात लँडिंग, पण असं का?  title=
worlds most challenging airport bhutan where only 50 pilots are qualified to land

Travel News : भटकंती... अनेकांच्याच आवडीचा विषय. अशा या भटकंतीदरम्यान, विविध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळते. इतकंच नव्हे, तर काही अशा गोष्टी अनुभवता येतात ज्या डोकं भांडावून सोडतात आणि असंख्य प्रश्नांना जन्मही देतात. असंच एक ठिकाण किंबहुना अशा एका विमानतळाविषयी आपण जाणून घेणार आहोत. 

ही आश्चर्याची म्हणण्यापेक्षा कुतूहलाचीच बाब आहे कारण भूतानमधील पारो हे एक असं विमानतळ आहे जिथं जाणं अनेकांचच स्वप्न असतं. चारही बाजूंनी हिमालयाच्या पर्वतशिखरांच्या कोंदणात असणारं हे विमानतळ जगातील सर्वाधिक आव्हानात्मक विमानतळ मानलं जातं. 

इथं वैमानिक भूपृष्ठापासून साधारण 18000 फूट इतक्या उंचच उंच डोंगर आणि पर्वतरांगांतून अंदाज घेत लँड करतात. इथं धावपट्टीवर विमान उतरवणं कोणआ नवख्या व्यक्तीचं कामच नाही. जगभरातून फक्त 50 वैमानिकांनाच हे आव्हानात्मक काम झेपत असून, या सर्व वैमानिकांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. 

हेसुद्धा वाचा : सगळ्यात कमी Office Hours असलेला देश कोणता? यादी पाहाच

 

लहानातली लहान धावपट्टी अर्थात रनवे आणि किमान रडार मार्गदर्शनाच्या बळावर विमान उतरवण्याचं विशेष प्रशिक्षण या मंडळींना दिलं जातं. सीएनएनशी संवाद साधताना द्रुक एअरचे वैमानिक कॅप्टन चिमी दोर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार पारोमधील विमानतळावर विमान उतरवण्यासाठी त्या व्यक्तीला स्थानिक ठिकाणांविषयीची पूर्वकल्पना असणं अपेक्षित असतं. सोबतच त्यांना इथं विमान उतरवण्याचं रितसर प्रशिक्षण असणंही गरजेचं. 

विमानतळ म्हणजे आश्चर्यच जणू.... 

भूतानमधील हे विमानतळ समुद्रसपाटीपासून 7382 फूट इतक्या उंचीवर असून या भागात विरळ हवेमुळं विमानांचा वेग आपोआप वाढून त्यामुळं विमान धावपट्टीवर सुरक्षितरित्या उतरवणं आव्हानात्मक ठरतं. त्यातच भर असते ती म्हणजे येथील क्षणभंगुर हवामानाची. सहसा पारो विमानतळावर दुपारच्या वेळी विमानं उतरवली जात नाही, कारण ठरतं ते म्हणजे इथं वाढणारा वाऱ्याचा वेग. पावसाळी दिवसांमध्ये इथं विमान उतरवणं मोठं आव्हान. इतकंच नव्हे तर रात्री किंबहुना सूर्यप्रकाश कमी झाल्यानंतरही पारो विमानतळावर विमानं उतरवली जात नाहीत. सभोवताली असणाऱ्या उंचच उंच पर्वतरांगांमध्ये विमान कोसळण्याची भीती असल्यामुळं हे सर्व निर्णय घेण्यात आले आहेत. 

पारो विमानतळावर खऱ्या अर्थानं श्वास रोखला जातो. त्यामुळं प्रवासातील थरार अनुभवण्याच्या विचारात असाल तर एकदा या अशक्य पण तितक्याच असामान्य विमानतळावर नक्की या.... आणि अनुभवा 'जगात भारी' वैमानिकांचं कौशल्य.