Population explosion : जगात वाढती लोकसंख्या (Population) हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. एका अहवालानुसार 15 नोव्हेंबरला म्हणजे आज पृथ्वीवरची लोकसंख्येने 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 12 वर्षात लोकसंख्येत तब्बल 100 कोटींची वाढ झाली आहे. बारा वर्षांआधी लोकसंख्या 700 कोटी होती, जी आता 800 करोडवर पोहोचली आहे.
आज जगाची लोकसंख्या 800 कोटी म्हणजे 8 अब्जावर पोहोचली आहे. पृथ्वीवरची वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय असला तरी लोकांना उत्सुकता आहे ते 8 अब्जावं (8 billionth) मुलं आहे तरी कोण? गुगलवर मोठ्या प्रमाणावर या बालकाला सर्च केलं जात आहे. आठ अब्जवं मुल सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारत, चीन अमेरिका किंवा ब्रिटेनमध्ये जन्मलं असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते तसं नाही. या मुलाचा जन्म झालाय फिलिपाइन्सची (Phillippines) राजधानी मनीलामध्ये. आज सकाळी मनीलामध्ये 8 अब्जव्या मुलीचा जन्म झाला.
येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत जगाची लोकसंख्या 8 अब्जावर पोहोचेल असा अंदाज संयुक्त राष्ट्राने वर्तवला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला. नवजात मुलीचं नाव विनिस माबनसाग ठेवण्यात आलं आहे. तिच्या जन्माने आई मारिया मार्गरेट विलोरेंट प्रचंड खुश आहे. माझी मुलगी जगातील 8 अब्जावी ठरली आहे हा मला आशिर्वाद मिळाल्यासारखं असल्याचं मारियाने म्हटलं आहे.
LOOK: Meet baby girl Vinice Mabansag—isa sa sumisimbolo bilang ika-8 bilyong tao sa mundo. Ipinanganak siya sa Dr. Jose Fabella Memorial Hospital kaninang 1:29am. | @gmanews pic.twitter.com/RQE0NSZCjm
— Nico Waje (@nicowaje) November 14, 2022
5 अब्जवं मुल कोण आहे?
8 अब्जवं मुल कोण आहे हे जसं शोधलं जातंय, तशीच उत्सुकता आहे पाच, सहा अब्जवा मुल कोण होतं याची. 11 जुलै 1987 ला जगात 5 अब्जव्या मुलाचा जन्म झाला. क्रोशियामध्ये जन्मलेल्या या मुलाचं नाव मतेज गॅस्पर आहे. 12 ऑक्टोबर 1999 ला सहा अब्जव्या मुलाचा जन्म झाला, त्याचं नाव आहे अदनना. संयुक्त राष्ट्राचे महासचिव कोफी अन्नान हे स्वत: त्या मुलाच्या नामकरण विधीला उपस्थित होते. 2011 मध्ये जन्मलेली सादिया सुल्ताना ओशी ही जगातील 7 अब्जवी बालक ठरली होती.
लोकसंख्या वाढीचा वेग
जगाच्या लोकसंख्यावाढीचा आधीचा वेग पाहिला तर सन 1804 मध्ये जगाची लोकसंख्या 100 कोटी होती, ती 200 कोटी होण्यास 123 वर्षांचा कालावधी जावा लागला. त्यानंतर 200 कोटी लोकसंख्येचे 300 कोटी होण्यास फक्त 33 वर्षे लागली आणि त्यानंतर 300 कोटींची 400 कोटी लोकसंख्या फक्त 14 वर्षांत झाली. जगाच्या लोकसंख्येने आतापर्यंत सातशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आणि आता फक्त 12 वर्षात हा दर 800 कोटींवर पोहोचेल. UN DESA च्या वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉसपेक्ट्स 2022 अहवालानुसार सन 2037 पर्यंत लोकसंख्या 900 कोटी आणि 2058 पर्यंत लोकसंख्येने 1000 कोटीचा टप्पा पार केला असेल.
ज्या देशांचा प्रजनन दर जास्त तेथे धोका अधिक
वाढत्या लोकसंख्येमुळे आगामी काळात अनेक आव्हानं उभी रहाणार आहेत. हजार कोटींच्या लोकसंख्येला जगण्यासाठी कठिण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉसपेक्ट्सच्या (World Population Prospects) मते ज्या देशात प्रजनन दर (Fertility Rate) जास्त आहे त्या देशांना धोका अधिक आहे. मनुष्य जंगल, पाणी आणि जमीन या नैसर्गिक (Nature) गोष्टींवर अवलंबून असतो. भविष्यात या गोष्टींसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. जमीनीसाठी नैसर्गिक जंगलं तोडून मनुष्य नैसर्गिक आपत्तींना आमंत्रण देत आहे. कार्बन उत्सर्जन वाढल्याने पृथ्वीवरील हिमनद्या पाण्यात बदलतील आणि ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढेल. तसंच समुद्राची पातळीही झपाट्याने वाढेल. असे अनेक मोठे धोके भविष्यात दिसणार आहेत.