नवी दिल्ली : जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे गुरुवारी सीआरपीएफचे जवान जात असणाऱ्या बसच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले. याच हल्ल्याचा निषेध करत आता अनेक संघटना, गट, देशांनी पाकिस्तानविरोधी भूमिका ठामपणे मांडत त्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली. WION तर्फे आयोजित करण्यात आलेल्या Global Summit: South Asia Edition या परिषदेत पाकिस्तानकडून सहभागी होणाऱ्या सर्व राजनैतिक पाहुण्यांचे आमंत्रण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २० फेब्रुवारी रोजी ही परिषद दुबईमध्ये पार पडणार आहे.
पुलवामावर झालेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र वातावरण बिघडले असून, आता पाकिस्तानशी याविषयी सामुक पातळीवर विचारविनिमय करणे अशक्य आहे. ज्यामुळेच हा निर्णय़ घेण्यात आला असल्याचे समोर येत आहे.
WION कडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात येणार नाही. पुलवामा हल्ल्य़ावर चौधरी यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. चौधरी यांच्याशिवाय पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव सलमान बशिर यांना या संमेलनातून वगळण्यात आले आहे.
पाकिस्तानवर WION कडून बहिष्कार टाकण्यात आला असला तरीही, या संमेलनातील इतर कार्यक्रम हे रुपरेषेप्रमाणेच पार पडणार आहेत. ज्यामध्ये माध्यमांचा बदलता चेहरा, भारत- मालदीव यांच्यातील संबंध, भागीदारी, राष्ट्रउभारणीमधील महिलांची भूमिका या आणि अशा इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. भारताचा दृष्टीकोन नेहमीच जगासमोर सादर करण्यात WION ने हातभार लावला आहे. ज्यामध्ये देशाचा हानी पोहोचवणाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचीही ठाम भूमिका घेण्यात येते. पुलवामातील हल्ल्याच्या निषेधार्थ हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेत शहीदांना WIONकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.