मुंबई : पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे मध्य-पूर्वेमध्ये आधीच तणाव आहे. लेबनानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानाने आता नवा वाद निर्माण झाला आहे. लेबनानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या अपमानास्पद टीकेमुळे संतप्त झालेल्या सौदी अरेबिया, कुवेत आणि बेहरिन यांनी लेबनीज राजदूतांना खडसावले आहे. लेबनानचे कार्यवाह परराष्ट्रमंत्री चार्बल वेहबे यांनी सौदी अरेबिया, कुवैत आणि बेहरिनवर अवमानकारक टीका केली.
या देशाच्या मदतीमुळेच सीरिया आणि इराकमध्ये आयसीसी सारखी दहशतवादी संघटना उभी राहिली. या वक्तव्यानंतर दबाव इतका वाढला की, त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, लेबनानच्या राजदूताला चार्बल वेहबे यांच्या वक्तव्यामुळे नोटीस पाठविली आहे. जारी केलेल्या निवेदनात सौदी अरेबियाने म्हटले आहे की, लेबनानच्या परराष्ट्रमंत्र्यांचे हे विधान मूलभूत मुत्सद्दी नियमांचे उल्लंघन आहे. याचा परिणाम दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांवर होणार आहे. तसेच बोहरिन व कुवैत यांनीही लेबनानच्या राजदूतांना बोलावून निषेध नोंदविला आहे.
अरब न्यूजच्या वृत्तानुसार, बेहरिनने लेबनानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. बेहरिनने म्हटले की, परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य लेबनानचे लोकं आणि आखाती देशांमधील ऐतिहासिक संबंधांशी सुसंगत नाही. लेबनानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानावरही त्याच भाषेत टीका केली आहे.
दरम्यान, लेबनानचे राष्ट्राध्यक्ष मिशेल आउन यांनी परराष्ट्रमंत्री वेहबे यांच्या विधानापासून स्वत:ला अलिप्त ठेवसे आहे. त्यांनी मंगळवारी सांगितले की, लेबनान आखाती देशांशी विशेषत: सौदी अरेबियाशी चांगले संबंध राखण्यासाठी उत्सुक आहेत. राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, "परराष्ट्रमंत्र्यांची टिप्पणी त्यांचे वैयक्तिक मत आहे. परराष्ट्रमंत्र्यांची टिप्पणी कोणत्याही प्रकारे लेबनन व राष्ट्राध्यक्ष जनरल मिशेल आऊन यांचे प्रतिनिधित्व करीत नाही.'
काय आहे प्रकरण?
लेबनानचे परराष्ट्रमंत्री वेहबे सोमवारी रात्री टेलिव्हिजन चॅनल अल-हुर्रावरील कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात सौदी अरेबियातील पाहुणेही सहभागी होत होते. चर्चेदरम्यान सौदीच्या प्रतिनिधीने लेबनानच्या राष्ट्राध्यक्ष हिज्बुल्लाह या इराण समर्थित लेबनीज सशस्त्र गटाला राजकीय सुरक्षा पुरविल्याबद्दल टीका केली. याचा राग आल्याने लेबनानचे परराष्ट्रमंत्री वेहबे यांनी आखाती देशांवर इसिस या दहशतवादी संघटनेची स्थापना केल्याचा आरोप केला. टेलिव्हिजन कार्यक्रमात होणारी भांडणे इतकी वाढली की त्यांनी सौदी अरेबियाच्या पाहुण्याला 'खानाबदोश' म्हटले. या भांडणानंतर लेबनीज परराष्ट्रमंत्र्यांनी कार्यक्रम सोडला आणि स्टुडिओच्या बाहेर निघून गेले.
हिज्बुल्लाला राजकीय संरक्षण देण्याच्या सौदीच्या प्रतिनिधीने केलेल्या टीकेवर वेहबे म्हणाले की, "मी ते स्वीकारणार नाही. मी लेबनानमध्ये आहे आणि एक खानाबदोश माझा अपमान करीत आहे."
लेबनीजच्या परराष्ट्रमंत्र्यांनी असा आरोप केला की प्रेम, मैत्री, बंधुतेला प्राधान्य देणाऱ्या या देशांनी 2014 मध्ये सिरिया आणि इराकमधील निनवे, अनबर आणि पालमायराच्या मैदानी भागावर इस्लामिक राज्य उभे केले. इस्लामिक स्टेटने या भागांचा ताबा घेतला आहे.
जेव्हा लेबनानच्या परराष्ट्रमंत्र्यांना इस्लामिक स्टेटच्या निर्मितीस जबाबदार असलेल्या देशांची नावे विचारण्यात आली तेव्हा त्यांनी कोणाचेही नाव घेण्यास नकार दिला. आखाती देशांचा संदर्भ देऊन त्यांना या देशांची नावे सांगण्यास सांगण्यात आले. आखाती देशांनी इसिसला अर्थसहाय्य दिले आहे का, असे विचारले असता वेहब यांनी यावर उत्तर दिले आणि ते म्हणाले, "मग त्यांना वित्तपुरवठा कोणी केला, मीच त्यांना आर्थिक मदत केली? बंधुत्व आणि मैत्रीचा दावा करणारे देशच त्यांना वित्तपुरवठा करीत आहेत."
परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्यावरून लेबनान आणि सौदी अरेबियात सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. लेबनानचे पंतप्रधान साद हरीरी यांनी कठोर शब्दात टीका केली आहे. परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे अरब देशांशी लेबनानचे संबंध ताणले जातील असा इशारा त्यांनी दिला आहे.