तालिबान कोण आहे? अफगाणिस्तानमध्ये सरकारला झुकावणाऱ्या तालिबानचे मुख्य नेते कोण?

तालिबानने अफगाणिस्तान पूर्णपणे काबीज केले आहे. मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडीओ फुटेजनुसार, तालिबानच्या सैनाने अफगाणिस्तानच्या काबुलच्या राष्ट्रपती राजवाड्यावर कब्जा केला आहे.

Updated: Aug 16, 2021, 09:05 PM IST
तालिबान कोण आहे? अफगाणिस्तानमध्ये सरकारला झुकावणाऱ्या तालिबानचे मुख्य नेते कोण? title=

मुंबई : तालिबानने अफगाणिस्तान पूर्णपणे काबीज केले आहे. मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडीओ फुटेजनुसार, तालिबानच्या सैनाने अफगाणिस्तानच्या काबुलच्या राष्ट्रपती राजवाड्यावर कब्जा केला आहे. फुटेजमध्ये, तालिबान लढाऊंचा एक मोठा गट राजधानी काबुलमधील राष्ट्रपती भवनाच्या आत दिसत आहे. तालिबान राष्ट्रपती भवनातून अफगाणिस्तानवर आपला ताबा घेण्याची घोषणा करेल आणि 'अफगाणिस्तानचे इस्लामिक अमिरात' असे देशाचे नाव पुन्हा ठेवेल.

त्याचवेळी, तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले की, अतिरेकी संघटना अफगाणिस्तानमध्ये खुले, सर्वसमावेशक इस्लामी सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने चर्चा करत आहे. आता सर्वच देशात तालिबान आणि अफगाणिस्तान यांच्या तिल या परिस्थितीबद्दल चर्चा सुरू आहे. परंतु अनेक लोकांना याबद्दल काहीही माहिती नाही त्यामुळे त्यांना आम्ही थोडक्यात माहिती देणार आहोत की, तालिबान कोण आहे? तालिबानचे उद्देश काय आहे आणि या संघटनेचे प्रमुख नेते कोण आहेत?

तालिबान कोण आहे?

मुल्ला मोहम्मद उमरने (Mullah Mohammad Omar) 1994 मध्ये आपल्या डझनभर अनुयायांसह तालिबानची स्थापना केली आणि गृहयुद्धात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला आव्हान दिले. परंतु गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला संपवण्याच्या उद्देशाने सत्तेत आलेला तालिबानने लोकांना त्रास द्यायला सुरूवात केली. पश्तोमध्ये तालिबानचा शाब्दिक अर्थ 'विद्यार्थी' आहे. हा शब्द संस्थापक सदस्य मुल्ला मोहम्मद उमरचा विद्यार्थी असल्याचा संदर्भ आहे. या गटाने मूळतः तथाकथित 'मुजाहिदीन' सेनानींना आकर्षित केले ज्यांनी तत्कालीन यूएसएसआर सैन्याला 1980 च्या दशकात अफगाणिस्तानातून हाकलून लावले.

यानंतर तालिबानने 1996 मध्ये अफगाणिस्तानवर कब्जा केला. तालिबानने पाच वर्षे देशभर सरकार चालवले. त्याच वेळी, 2001 मध्ये, अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानात घुसून तालिबानला सत्तेतून बेदखल केले. मुल्ला मोहम्मद उमर अमेरिकेमुळे अज्ञातवासात गेला.

तालिबानचे मुख्य नेते कोण आहेत?

हैबतुल्लाह अखुंदजादा: रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या मते, इस्लामिक कायदेशीर विद्वान हैबतुल्लाह अखुंदजादा हे तालिबानचे सर्वोच्च नेते आहेत. गटाच्या राजकीय, धार्मिक आणि लष्करी बाबींवर अंतिम अधिकार अखुंदजादाकडे आहे. त्याने 2016 मध्ये अफगाण-पाकिस्तान सीमेजवळ अमेरिकन ड्रोन हल्ल्यात ठार झालेल्या अख्तर मन्सूरची जागा घेतली.

मुल्ला अब्दुल गनी बरादर: अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा ताबा झाल्यानंतर मुल्ला अब्दुल गनी बरादर देशाचे नवे राष्ट्रपती बनू शकतात. बरादर तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख आहेत आणि दोहामधील विविध भागधारकांशी राजकीय तोडगा काढणाऱ्या संघाचा भाग आहेत. रविवारी ते म्हणाले, अतिरेकी संघटनेचा विजय अनपेक्षितपणे वेगाने झाला. या जगात या विजयासाठी कोणताही सामना होणे शक्य नाही.

याकूब उमर: मुल्ला उमरचा मुलगा याकूब उमर (Yaqoob Omar) हा देखील तालिबानचा प्रमुख नेता आहे. मुल्ला उमरने 1996 मध्ये अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातची पायाभरणी केली. याकूब तालिबानच्या परदेशी कारवायांवर देखरेख करतो. रॉयटर्सने तालिबान कमांडरच्या हवाल्याने म्हटले आहे की, याकूबकडे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. परंतु त्याने स्वतःच त्याचे लहान वय आणि युद्धभूमीवर कमी अनुभवामुळे हैबतुल्लाह अखुंदजादाचे नाव समोर ठेवले.

सिराजुद्दीन हक्कानी: प्रसिद्ध सोव्हिएत विरोधी जिहाद कमांडर जलालुद्दीन हक्कानी यांचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानी तालिबान चळवळीचा उपनेता तसेच हक्कानी नेटवर्कचे नेतृत्व करतो. हक्कानी नेटवर्क हा अमेरिकेने नियुक्त केलेला दहशतवादी गट आहे, जो गेल्या दोन दशकांमध्ये अफगाणिस्तान आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो सैन्याशी लढणाऱ्या सर्वात धोकादायक गटांपैकी एक म्हणून पाहिला जातो.