मुंबई : घरबसल्या लाखोंची कमाई होत असेल तर कोणाला आवडणार नाही. एका राज्यात सरकार नागरिकांना लाखो रुपये देण्याच्या तयारीत आहे. वाढत असलेली एक मोठी समस्या दूर करण्याचा यामागे हेतू आहे. सरकारच्या या ऑफरमुळे लाखो लोक प्रभावित होऊन त्या राज्यात राहणे पसंत करतील.
अमेरिकेतील वर्मांट राज्यासाठी सरकारने ही नवी योजना सुरु केली आहे. यामुळे दुसऱ्या राज्यात काम करणारे लोक येथे येऊन राहण्यास सुरुवात करतील. यात दुसऱ्या राज्यातून या राज्यात शिफ्ट होण्यापासून ते अन्य वस्तूंचा खर्च मिळून सरकार १० हजार डॉलर म्हणजेच ६,६९,८९० रुपये देईल. ही रक्कम दोन वर्षात अर्धी-अर्धी दिली जाईल. या राज्यात शिफ्ट होणारी व्यक्ती दुसऱ्या राज्यात असलेल्या ऑफिसचे काम घरबसल्या उत्तम प्रकारे करु शकेल. यासाठी इंटरनेट यांसारख्या इतर सुविधा सरकारकडून पुरवल्या जातील.
हाती आलेल्या माहितीनुसार, वर्मांट राज्य एका गंभीर समस्येला सामोरे जात आहे. येथे वृद्धांची संख्या तरुणांच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तरुणांचे कामानिमित्त मोठ्या शहरांकडे झालेले पलायन. वर्मांट हे लहान राज्य असल्याने येथे कोणतीही मोठी कंपनी किंवा ऑफिस नाही. यामुळे लोक रोजगाराच्या शोधात दुसऱ्या राज्यात जात आहेत. या स्थितीमुळे या राज्यात वृद्धांची संख्या तरुणांपेक्षा अधिक आहे. परिणामी हे राज्य अमेरिकेतील सर्वात वृद्ध राज्य बनले आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २००९ च्या तुलनेत यावर्षी तरुणांची संख्या सुमारे १६,००० हून कमी आहे. ही स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. काम करणाऱ्या लोकांच्या कमतरतेमुळे टॅक्स देखील कमी येत आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थितीही खालावत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने ही नवी योजना सुरु केली आहे. वर्मांट राज्यात शिफ्ट होणाऱ्या लोकांना १० हजार डॉलर देण्याची सरकारने योजना आखली असून ती २०१९ पासून लागू केली जाईल.