मुंबई : नॉर्वे देशातील होडालँड प्रांतात ट्रोलटुंगा नावाचा सुळका आहे. हा सुळका डोंगरातून समांतर दिशेनं बाहेर निघालाय. हा सुळका पाहण्यासाठी जगभरातून साहसवीर नॉर्वेत येतात. ट्रोलटुंगा म्हणजे साहसवीरांची पंढरी असल्याचं म्हटलं जातं आहे.
युरोपातील नॉर्वे या देशात पाहण्यासारखी एकाहून एक सरस ठिकाणं आहेत. पण जर तुम्ही साहसी असाल तर तुम्ही एकदा ट्रोलटुंगाच्या सुळक्याचा ट्रेक करुन आलाच पाहिजे. ट्रोलटुंगा होडालँड प्रांतातल्या ओडा शहरापासून जवळ असलेला डोंगराचा एक सुळका आहे. रिंगडेल सरोवराजवळ ट्रोलटुंगा डोंगराचा सुळका आहे. हा सुळका अचानक डोंगरापासून समांतर स्थितीत बाहेर निघाला आहे.
एखाद्या डोंगरानं हात बाहेर काढावा तसा हा सुळका पाहायला मिळतो. या सुळक्यावर उभं राहिल्यावर तुम्हाला अवकाशातच उभं राहिल्याचा भास होतो. कारण हा सुळका जवळपास अकराशे मीटर उंचीवर आहे. या सुळक्यावरुन काही जण पाय सोडून बसतात. कोणी या सुळक्यावर कोलांटउड्या मारायला येतो. काही जण तर या सुळक्यावर बसून रात्रभर आकाश न्याहाळतात. तर काही तरुण या सुळक्यावर स्लिपिंग बॅगमध्ये चक्क ताणून देतात.
सकाळी सूर्याची पहिली किरण जेव्हा आपल्या अंगावर पडतात तेव्हा सूर्यकिरणांचे पहिले लाभार्थी असल्यासारखं वाटतं. ट्रोलटुंगा ट्रेकसाठी जगभरातून हजारो पर्यटक येत असतात. जून ते सप्टेंबर हा काळ इथल्या ट्रेकसाठी आदर्श आहे. ट्रोलटुंगाच्या सुळक्याजवळ एक डोंगरावरून तुषार कोसळताना दिसतात. ट्रोलटुंगा दिसायला जेवढा मोहक आहे तेवढा धोकादायकही आहे. २०१५ साली एका ऑस्ट्रेलियन महिलेचा ट्रोलटुंगा सुळक्यावरुन पडून मृत्यू झाला होता. इथं जाताना स्थानिक ट्रेकर्सचा सल्ला घेऊनच चढाई करावी असं सांगितलं जातं. पण एवढं सुंदर ठिकाण पाहायचं म्हटल्यावर थोडासा धोका तर पत्करायलाच हवा ना?...