'माऊंट एव्हरेस्ट'वर 'ट्राफिक जाम', अकलूजच्या निहालसहीत तीन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू

आठवड्याभरात तीन भारतीय गिर्यारोहकांसोबतच एकूण आठ जणांचा एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान मृत्यू 

शुभांगी पालवे | Updated: May 24, 2019, 03:43 PM IST
'माऊंट एव्हरेस्ट'वर 'ट्राफिक जाम', अकलूजच्या निहालसहीत तीन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू   title=

मुंबई : मूळचा अकलूज येथील रहिवासी असलेल्या २७ वर्षीय गिर्यारोहक निहाल बागवान याचा एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान दुर्देवी मृत्यू झालाय. एव्हरेस्ट शिखर सर करून त्यावर भारताचा ध्वज फडकावल्यानंतर परतीच्या मार्गावर असताना त्याचा मृत्यू झाला. नेपाळ पर्यटन विभागाच्या प्रवक्त्या मीरा आचार्य यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय.

एव्हरेस्टवर ट्राफिक जाम

मिळालेल्या माहितीनुसार, मे-जून महिन्यात (वसंत ऋतूत) नेपाळकडून एव्हरेस्ट मोहिमेसाठी ४४ टीम्समधील एकूण ३८१ जणांना परवाना दिला गेलाय. यासाठी प्रत्येकाकडून ११,००० डॉलर (जवळपास ७,६६,३५९ रुपये) इतकी मोठी रक्कम वसूल केली जाते. जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या 'माऊंट एव्हरेस्ट'च्या आकर्षणामुळे इथे दाखल होणाऱ्या गिर्यारोहकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे 'ट्राफिक जाम'ची समस्या दिसून येतेय. सध्या एव्हरेस्टवर एकाच वेळी २०० हून अधिक गिर्यारोहक आपली मोहीम पूर्ण करताना दिसत आहेत. या सीझनमध्ये आत्तापर्यंत १५ गिर्यारोहकांनी आपले प्राण गमावलेत.


अकलूजचा निहाल बागवान

निहालचा मृत्यू

उंचावर हवेतील ऑक्सिजन विरळ होत असताना निहाल बागवान हा एव्हरेस्टवरून खाली परतणाऱ्या 'ट्राफिक'मध्ये अडकला. त्याच्यासोबत असणाऱ्या शेरपांनी त्याला कॅम्प ४ पर्यंत कसंबसं आणलं... परंतु, एव्हाना निहालला श्वास घेणंही कठिण झालं होतं. कॅम्प ४ वरच त्यानं अखेरचा श्वास घेतला.

Image result for anjali kulkarni
मृत अंजली कुलकर्णी आणि शरद कुलकर्णी

कल्पना दास, अंजली कुलकर्णी यांनीही गमावले प्राण

गुरुवारी २३ मे रोजी कल्पना दास या ५२ वर्षीय भारतीय महिलेचाही एव्हरेस्टवर प्रकृती बिघडल्यानं मृत्यू झाला होता. त्याअगोदर बुधवारी, मुंबईच्या रहिवासी ५५ वर्षीय अंजली कुलकर्णीही एव्हरेस्टवरच्या याच 'ट्राफिक जाम'च्या बळी ठरल्या. परतीच्या वाटेवर असताना अंजली यांचा पाय घसरून त्या जखमी झाल्या. त्यानंतर कॅम्प ४ वर त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. अंजली यांच्यासोबत त्यांचे पती शरद कुलकर्णीदेखील एव्हरेस्ट मोहिमेवर होते.

Image result for kalpana das
मृत कल्पना दास

गिर्यारोहकांचा जीव धोक्यात

शुक्रवारी, 'एव्हरेस्ट एक्सपेडिशन' आयोजकांनी याबद्दल माहिती देताना, आठवड्याभरात तीन भारतीय गिर्यारोहकांसोबतच एकूण आठ जणांचा एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलंय.

१५ मे : कोलकाताचा ४८ वर्षीय गिर्यारोहक बिप्लब वैद्य यांचा कांचनजुंगा सर करून परतताना मृत्यू

१५ मे : ४६ वर्षीय कुंतल कंवर यांचा कांचनगंगा सर करताना मृत्यू 

१६ मे : हिमालयातील 'माऊंट मकालू' चढाई दरम्यान सेनेचे जवान नारायण सिंह यांचा मृत्यू

१७ मे : माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर भारतीय गिर्यारोहक रवि ठाकूर यांचा मृत्यू, बेसकॅम्पजवळ ते मृतावस्थेत आढळले

२२ मे : एव्हरेस्ट मोहिमेवर असलेल्या ५५ वर्षीय अमेरिकन नागरिक डॉन कॅश यांचा मृत्यू 

२३ मे : माऊंट एव्हरेस्टच्या कॅम्प ४ वर मुंबईच्या गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांचा मृत्यू 

२३ मे : माऊंट एव्हरेस्टवर तब्येत बिघडल्यानं कल्पना दास यांचा मृत्यू

२४ मे : आणि आज महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या निहाल बागवान याचा मृत्यू झाल्याची बातमी हाती येतेय