Nottingham Attack : इंग्लंडमधील (England) नॉटिंगहॅम येथे झालेल्या चाकू हल्ल्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यीनीचा (Gracy Omale Kumar) देखील समावेश आहे. मंगळवारी पहाटे हल्लेखोराने तिघांवरही चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये भारतीय वंशाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर स्थानिक पोलिसांनी (Englan Police) घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला आहे. पोलिसांनी हल्लेखोराची ओळख पटवली असल्याची माहितीही समोर आली आहे.
ग्रेसी ओमॅली कुमार (19) असे मृत भारतीय वंशाच्या मुलीचे नाव आहे. मंगळवारी पहाटे हल्लेखोराने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला तेव्हा ग्रेसी ओ'मॅली कुमार ही तिच्या नॉटिंगहॅम विद्यापीठातील मित्र आणि क्रिकेटर बर्नाबी वेबर याच्यासोबत होते. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. नॉटिंगहॅमशायर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय संशयिताने आणखी एका 60 वर्षाच्या एका व्यक्तीलाही भोसकून ठार मारले आणि त्याची गाडी चोरून तीन लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नॉटिंगहॅमशायर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही या घटनेचा तपास करण्यासाठी आम्ही दहशतवादविरोधी पोलिसांसोबत काम करत आहोत.' तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी म्हटलं की, "काल नॉटिंगहॅममध्ये झालेल्या धक्कादायक घटनेनंतर आपत्कालीन सेवांनी मदत पोहोचवली आहे. जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांसोबत आम्ही उभे आहोत." इग्लंडच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी या भयानक घटनेबद्दल संसदेला माहिती दिली आणि सांगितले की याला आताच दहशतवादी हल्ला म्हणता येणार आहे.
या घटनेनंतर अधिकाऱ्यांचे एक पथक या घटनेच्या सभोवतालच्या परिसराचा तपास करत आहे. दरम्यान, पोलिसांनी अधिकृतपणे पीडितांची नावे जाहीर केलेली नाहीत पण स्थानिक माध्यमांनी ग्रेसीबद्दल काही माहिती दिली आहे. ती लंडनमध्ये राहणारे भारतीय वंशाचे डॉक्टर संजय कुमार यांची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. 2009 मध्ये चाकूच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काही तरुणांचे प्राण वाचवणारे डॉक्टर म्हणून संजय कुमार यांची ओळख होती.
तर ग्रेसी इंग्लंडच्या 18 वर्षाखालील हॉकी संघाकडून खेळली होती आणि ती एक क्रिकेटपटूही होती. या हल्ल्यानंतर इंग्लंड हॉकी क्रीडा संघटनेने ग्रेसी आणि तिच्या मित्राला श्रद्धांजली वाहिली आहे. मंगळवारी नॉटिंगहॅममध्ये ग्रेसी कुमारच्या दुःखद निधनाच्या वृत्ताने आम्हा सर्वांना खूप दुःख झाले आहे, असे हॉकी संघटनेने म्हटलं. एसेक्समधील वुडफोर्ड वेल्स क्रिकेट क्लबने ग्रेसी कुमारला अत्यंत प्रतिभावान आणि समर्पित क्रिकेटर म्हटलं आहे