मुंबई : तुम्ही आम्ही घड्याळाच्या काट्यावर चालतो. आपली दिनचर्या घड्याळावर चालते. पण जगातलं एक गाव असं आहे ज्या गावाला घड्याळच नको आहे. नार्वे देशातील सोमरे बेटावरील लोकांनी काळमुक्त, घड्याळमुक्त आयुष्य देण्याची मागणी केली आहे.
आपलं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर चालतं. विशेष करून मुंबईकरांचं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर आहे. घड्याळाच्या काट्यावर धावताना मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडते. पण हेच घड्याळाच्या काट्यावरचं आयुष्य मुंबईकरांना हवंहवंसं वाटतं. पण जगातलं एक बेट असं आहे जिथल्या लोकांना घड्याळाची टिकटिक नकोशी झाली आहे. त्यांना ना घड़्याळ हवंय, ना दिवस आणि रात्रीची बंधनं.
युरोपातल्या उत्तर धुव्राजवळ लागून नॉर्वे देशातील सोमरे बेट आहे. या बेटावर वर्षातले 69 दिवस सूर्य मावळतच नाही. सूर्य मावळतच नाही त्यामुळं रात्री बारा वाजताही या गावात लख्ख उजेड असतो. पण इथल्या लोकांना घड्याळाच्या वेळा पाळाव्या लागतात. लख्ख उजेडात रात्री नऊ वाजलेले असतात. त्यामुळं लोकांना जबरदस्ती ऑफिसेस आणि दुकानं बंद करावी लागतात. काळोख पडत नाही त्यामुळं रात्रीची अनुभूतीच इथल्या लोकांना घेता येत नाही.
घड्याळाची कटकट नको म्हणून सोमरे बेटाला टाईम फ्री झोन म्हणजे काळापासून मुक्त करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केलीय. नोव्हेंबर ते जानेवारीच्या काळात सोमरे बेटावर सलग रात्र असते. इथली रात्रही अतिशय सुंदर असते. रात्रीच्या वेळी सोमरेच्या आकाशात वेगवेगळ्या रंगछटा दिसतात. या काळात जगभरातले पर्यटक या गावात येतात.
पर्यटन आणि मासेमारी हे या बेटावरचे प्रमुख व्यवसाय आहेत. सकाळ दुपार संध्याकाळ असं कोणतंच कालचक्र गावकऱ्यांना नकोय. सोमरे बेटावरच्या लोकांच्या या मागणीला पाठिंबाही मिळतोय. आता पाहूयात नॉर्वे सरकार त्यांच्या मागणीचा कसा विचार करतं आहे.