शिकागो : अटलांटिक महासागरात गेल्या काही शतकातल्या सर्वात भयानक आयर्मा नावाच्या चक्रीवादळानं थैमान घातलं आहे. या वादळानं फ्रान्सच्या अधिपत्याखाली असलेली सेंट मार्टीन आणि सेंट बार्ट ही दोन द्विप उद्ध्वस्त झाली आहेत. या बेटांवर बुधवारी सकाळी ताशी 289 किलोमीटर वेगानं वारे वाहत होते. त्यामुळे बेटांवरच्या एकूण मालमत्तेपैकी 95 टक्के मालमत्ता जमीनदोस्त झाली आहे.
या वादळामुळे आतापर्यंत सहा नागरिकांचा बळी गेला आहे. बेटांवर पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, वादळाची तीव्रता अद्याप कमी झालेली नाही. येत्या काही तासांमध्ये हे वादळ अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याच्या किनाऱ्यावर हे वादळ धडकणार आहे. वादळाची भयावह तीव्रता बघता फ्लोरिडात मोठ्याप्रमाणात नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतर करत आहेत. प्रशासनानंही मालमत्ता आणि जीवित हानी होऊ नये यासाठी अभूतपूर्व तयारी केली आहे.