पाकिस्तानात हिंदू आणि मंदिरांचंही अस्तित्व धोक्यात

पाकिस्तानात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मंदिरं राहिलीयत

Updated: Jan 27, 2021, 09:38 PM IST
पाकिस्तानात हिंदू आणि मंदिरांचंही अस्तित्व धोक्यात title=

ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई : पाकिस्तानात हिंदू आणि मंदिरांचंही अस्तित्व धोक्यात आलंय. नुकतीच खैबर पख्तूनवा प्रांतात एका मंदिराची तोडफोड करण्यात आली. एकेकाळी पाकिस्तानात साडे चारशे ते पाचशे मंदिरं होती. आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मंदिरं राहिलीयत.

पाकिस्तानात हिंदू आणि मंदिरं दोन्ही धोक्यात आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात कट्टरपंथीयांनी हिंदू मंदिराची तोडफोड केली. कराक जिल्ह्यातल्या टेरी गावात हे मंदिर होतं. त्याची जमावानं तोडफोड केली.पाकिस्तानातली बहुतेक मंदिरं उध्वस्त करण्यात आलीयत. काही दिवसांपूर्वी इस्लामाबादमध्ये पहिलं हिंदू मंदिर बांधण्याची तयारी सुरू होती. पण त्यालाही विरोध होतोय. 

भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. त्यावेळी भारतानं धर्मनिरपेक्षता स्वीकारली तर पाकिस्तान कट्टर इस्लामी राष्ट्र झाला. फाळणीवेळी पाकिस्तानात ४२८ मंदिरं होती. १९९०मध्ये यातली बरीचशी मंदिरं तोडून तिथं दुकानं, रेस्टॉरंटस, किंवा मदरसे बांधण्यात आले. 

पाकिस्तानच्या तत्कालीनं सरकारने अल्पसंख्यांकाची प्रार्थनास्थळांची १.३५ लाख एकर जमीन इव्हॅक्युए प्रॉपर्टी ट्रस्ट बोर्डकडे दिली. या ट्रस्टनं सगळ्या मंदिरांची जमीन हडपली. 

६ डिसेंबर १९९२ मध्ये जेव्हा अयोध्येत बाबरी मशिद प्रकरण घडलं, त्यावेळी पाकिस्तानमधल्या १०० मंदिरांची तोडफोड करण्यात आली. सध्या पाकिस्तानात फक्त २० मंदिरं शिल्लक आहेत. त्यांचीही अवस्था वाईट आहे. तशीच अवस्था हिंदूंची आहे. अनेकांचं जबरदस्तीनं धर्मांतर केलं जातंय. पाकिस्तानमध्ये दरवर्षी १ हजारहून जास्त मुलींचं धर्मांतर केलं जातं. फाळणीवेळी पाकिस्तानात १५ टक्के हिंदू होते. 

आता पाकिस्तानात हिंदूंची संख्या फक्त दीड टक्का एवढी आहे. पाकिस्तान अल्पसंख्याकांवर अत्याचार करतंय, हे वारंवार समोर येतंय पण पाकिस्तानची नियत बदलत नाही.