Garba Dance : अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातील IT हब असणाऱ्या सिऍटल शहरात "बिट्स ऑफ रेडमंड" या स्थानिक सेवाभावी संस्थेच्या सौजन्याने अमेरिकेच्या वेस्ट कोस्ट मधील सर्वात मोठा आणि एकमेव विनाशुल्क गरबा व दांडिया सोहळा 1 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. त्यावेळी गरब्याच्या तालावर अमेरिकेतील सिऍटल नागरी थिरकल्याची पहायला मिळालं.
बिट्स ऑफ रेडमंड संस्थेने ISKCON सिऍटल आणि city of sammamish च्या सहकार्याने नवरात्रोत्सवानिमित्त seattle शहरात गरब्याचे आयोजन केले गेले. 4 वर्षांहून अधिकचा दैदीपम्यान इतिहास असणाऱ्या या मंडळाच्या नवरात्रोत्सवाला परिसरातील सुमारे 3500 विविध जाती- धर्माच्या भारतीयांनी आणि अमेरिकन नागरिकांनी हजेरी लावून गरब्याचा फेर धरला. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेच्या सुमारे 150 कार्यकर्त्यांनी पारंपरिक गरब्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते.
त्यावेळी उपस्थित सर्व लोकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावला. या उत्सवामध्ये रसिकांना गरब्यासोबतच लाइव्ह सिंगिंग चा आनंद देखील लुटता आला. "बिट्स ऑफ रेडमंड" च्या पट्टीच्या ढोल - ताशा वादकांनी आपल्या वैविध्यपुर्ण ताल-आविष्कारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. रात्री 8 वाजता सुरु झालेला हा रंगतदार गरबा महोत्सव मध्यरात्र उलटून गेल्यावरही सुरूच होता.
आनंद साने आणि दीपाली साने यांनी "मराठा तितुका मेळवावा" अशा बाण्याने 2019 साली वॉशिंग्टन राज्यातील सगळ्यात पहिल्या ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून "बिट्स ऑफ रेडमंड" ची स्थापना केली. आज या पथकाशी सुमारे 800 कुटुंब जोडलेली असून सगळे गुण्यागोविंदाने विविध भारतीय आणि स्थानिक उत्सव साजरे करतात. या संस्थेचा मूळ उद्देश आपल्या मायदेशापासून हजारो मैल लांब राहून सुद्धा महाराष्ट्राच्या समृद्ध अशा परंपरांचे जतन व प्रसार करणे आणि आपल्या पुढील पिढीला हा वारसा जपण्याची शिकवणूक देणे असा आहे. Beats of Redmond चे स्वयंसेवक अनेक नामांकित सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असून देखील वेळात वेळ काढून महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम चोख पार पाडतात.
दरवर्षी "बिट्स ऑफ रेडमंड" वॉशिंग्टन राज्यातील सर्वात मोठा सार्वजनिक गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात पार पाडते. त्यासोबतच नवरात्रोत्सव, दिवाळी, होळी, स्वातंत्र्य दिन, शिवजयंती आणि रामनवमी यासारख्या भारतीय सणांचे देखील ही संस्था यथोचित आयोजन करते. यावर्षी "बिट्स ऑफ रेडमंड" कडून अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच गोपाळकाल्याच्या आयोजन करण्यात आले होते आणि संस्थेच्या गोविंदानी हि मनाची हंडी मिवठ्या थाटामाटात फोडली. या सर्व सोहळ्यांसाठी ढोल ताशाच्या गजरासोबतच लेझीम, झांजा, लावणी आणि साहसी मर्दानी खेळांची मेजवानी अमेरिकास्थित भारतीयांना आणि स्थानिक लोकांना अनुभवायला मिळते.
पारंपारिक भारतीय सणांसोबतच "बिट्स ऑफ रेडमंड" चे ढोल ताशा पथक एक यशस्वी वाद्यवृंद म्हणून पंचक्रोशीत नावाजलेले आहे. नुकतेच या पथकाने ए. आर. रहमान यांच्या मैफिलीत स्वागतपर वादन केले. जेव्हा प्रख्यात क्रिकेटपटू कपिल देव यांनी Seattle ला भेट दिली तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी देखील Beats of Redmond लाच पाचारण करण्यात आले होते. याबरोबरच परिसरातील ISKCON आनंद मेळा सारखे अनेक भारतीय सांस्कृतिक सोहळे आणि Redmond Derby Parade सारख्या कैक स्थानिक कार्यक्रमांना Beats of Redmond ला आवर्जून निमंत्रण असते.
पाहा व्हिडीओ-
परदेशातही गरबा #videoviral pic.twitter.com/DmhdmDnAlc
— Harish Malusare (@harish_malusare) October 5, 2022
Beats of Redmond च्या विद्यमाने विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. प्रत्येक महिन्याच्या एका गुरुवारी Beats of Redmond चे स्वयंसेवक येथील साई बाबा मंदिरात स्वतः स्वयंपाक करून महाप्रसादाची व्यवस्था करतात. कोरोना साथीच्या च्या कठीण काळात देखील Beats of Redmond च्या स्वयंसेवकांनी अनेक लसीकरण मोहिमा राबवून स्थानिक समाजाप्रती कर्तव्याचे चोख पालन केले.