थायलंडमधील 'त्या' गुहेतून सहा मुलांना सुखरुप बाहेर काढले

आज सकाळी या बचाव मोहीमेच्या निर्णायक टप्प्याला सुरुवात झाली.

Updated: Jul 8, 2018, 07:59 PM IST
थायलंडमधील 'त्या' गुहेतून सहा मुलांना सुखरुप बाहेर काढले title=

चियांग राय(थायलंड): गेल्या दोन आठवड्यांपासून थायलंडमधील एका गुहेत अडकून पडलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी रविवारी निर्णायक मोहीम हाती घेण्यात आली. या मोहीमेला पहिले यश मिळाले आहे. आतापर्यंत सहा मुलांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आल्याचे समजते. सध्या या मुलांना गुहेनजीक असणाऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरु आहे. आज सकाळी या बचाव मोहीमेच्या निर्णायक टप्प्याला सुरुवात झाली. शनिवारी गुहेमध्ये पाणी सगळ्यात कमी स्तरावर जाऊन पोहोचले. यानंतर अधिकाऱ्यांनी मुलांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता.

या मोहीमेत थायलंड नेव्ही सील्सचे ५ आणि १३ परदेशी पाणबुडे सहभागी आहेत. सगळ्या मुलांना एकाचवेळी बाहेर आणणे शक्य नाही. त्यामुळे ही बचाव मोहीम तब्बल चार दिवस सुरु राहील, असा अंदाज आहे. दरम्यान, आता अंधार पडल्यामुळे बचाव मोहीम थांबवण्यात आली आहे. आता गुहेत आणखी सहा मुले आणि प्रशिक्षक असे एकूण सात जण उरले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी उद्या सकाळी पुन्हा बचाव मोहीम सुरु होईल. चियांग रांगच्या गव्हर्नरांनी या सर्व मुलांची भेट घेतली. या सर्व मुलांची प्रकृती उत्तम आहे.