Success Story Of Indian: गुजरातमधील कच्छ येथील मांडवीमध्य राहणारं कुटुंब काही वर्षांपूर्वी एका छोट्याश्या देशात स्थायिक झालं. त्या देशामध्ये हे कुटुंब उद्योजक म्हणून नावारुपास आलं. ज्या क्षेत्रात त्यांचा उद्योग व्यवसाय आहे त्या क्षेत्रातील त्यांची कंपनी ही दादा कंपनी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार आहे. या कुटुंबातील तिसऱ्या पिढीने मात्र एक वेगळाच व्यवसाय करण्याचं ठरवलं आणि त्यामधूनच सुनील शाह नावाच्या उद्योजकाचा उदय झाला. सेशल्स या देशातील अनेक बेटं आज शाह कुटुंबाच्या मालकीची आहे. सेशल्समधील अनेक आलिशान रिसॉर्ट्स हे शाह कुटुंबानेच सुरु केले आहेत.
सुनील शाह यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेला हा पर्यटन व्यवसायामधील डोलारा सध्या सर्व भारतीयांसाठी एक अभि्मानास्पद बाब आहे. सुनील शाह हे सेशल्सची राजधानी असलेल्या व्हिक्टोरिया शहरात मुख्यालय असलेल्या ए. जे. शाह अॅण्ड असोसिएट्सचे प्रमुख आहेत. ही सेशल्समधील आघाडीची अकाऊंटींग कंपनी आहे. सुनील शाह यांनी दशकभरापूर्वी त्यांचे वडील अनंत जीवन शाह यांच्या जोडीने पर्यटन क्षेत्रात प्रवेश केला. काही वर्षांपूर्वी निधन झालेल्या अनंत जीवन शाह यांच्या बरोबरन त्यांच्या लेकाने म्हणजे सुनील शाह यांनी सेशल्स या बेटसमुहावर वसलेल्या देशातील 115 छोटी बेटांपैकी एक मोठं बेट विकत घेतली. हे बेट जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र आहेत.
शाह यांनी विकत घेतलेलं राऊंड नावाचं बेट हे एकूण 0.018 स्वेअर किलोमीटर्सवर वसलेलं आहे. या बेटावर त्यावेळेस कोणीच वास्तव्यास नव्हतं. या ठिकाणी केवळ एक छोटं रेस्तराँ होतं. मात्र तिथे शाह यांनी एक आलिशान रिसॉर्ट सुरु केलं. या रिसॉर्टचं नाव एनचांडेट आइसलॅण्ड रिसॉर्ट असं आहे. देशातील महत्त्वाचा भाग असलेल्या सेंट अॅनी मरिन नॅशनल पार्कच्या भागातच हे बेट आहे. माहे नावाच्या प्रमुख बेटापासून बोटीने अवघ्या 10 मिनिटांमध्ये या बेटापर्यंत पोहचला येतं.
शाह यांनी 10 वर्षांपूर्वी हे बेट 9 मिलियन अमेरिकी डॉलर्सला विकत घेतलं. भारतीय चलनानुसार आजच्या घडीला ही रक्कम 74 कोटी, 92 लाख 81 हजार 500 रुपये इतकी होते. या बेटावर शाह यांनी 5 वर्षांपूर्वी रिसॉर्ट बांधलं. या बेटावर एकूण 8 बंगले आहेत. या बंगल्याचं व्यवस्थापन दुबईमधील एक हॉटेल कंपनी करत आहे. या ठिकाणी एका बंगल्यात 24 लोक राहू शकतात. या बंगल्याचं एका रात्रीचं भाडं 8.5 लाख रुपये इतकं आहे. एका दिवसाला एका व्यक्तीला या ठिकाणी राहण्यासाठी 45 हजार रुपयांपासून 1.5 लाखांपर्यंत खर्च येतो. म्हणजेच 8 बंगल्यांचा विचार केल्यास एका रात्रीमध्ये या बेटावरील रेसॉर्टमधून 50 लाखांच्या आसपास भाडं आकारलं जातं.
शाह यांना जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याची आवड आहे. स्पेन आणि फ्रान्समधील अनेक लिलावांमधून त्यांनी मैल्यवान वस्तू विकत घेतल्या आहेत. त्यांच्या या खासगी कलेक्शनचा वापर ते या बेटावरील रिसॉर्टच्या सजावटीसाठी करतात. जगभरातील गर्भश्रीमंत व्यक्ती शाह यांच्या मालकीच्या या बेटावरील बंगल्यांमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येतात. यात प्रामुख्याने युरोप, रशिया आणि मध्य आशियामधील गर्भश्रीमंत व्यक्ती आणि सेलिब्रिटींचा समावेश असतो.
आफ्रिका खंडाच्या मुख्य भूमीपासून सुमारे 1500 किमी अंतरावर पूर्वेला हिंदी महासागरात 115 लहान लहान बेटांचा हा सेशल्स देश बनला आहे. माहे हे या द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे. या बेटावरच सेशल्सच्या राजधानीचं शहर व्हिक्टोरिया वसलेलं आहे. पर्यटन क्षेत्रात ‘रोमँटिक’ म्हणून अत्यंत लोकप्रिय असलेल्या या द्वीपसमूहाच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांचे नाव आहे- वेवेल रामकलावन! त्यांचे पूर्वज भारतातील बिहारमधील गोपालगंजजवळच्या परसोनी गावचे होते.