आता बस झालं! 550 मुलांच्या बापावर कोर्टाने आणली बंदी, हैराण करणारं कारण

Jonathan Meijer: आपल्या विचित्र सवयीमुळे एक व्यक्ती कोर्टाच्या कचाट्यात अडकला आहे. आणखी मुलांना जन्माला घालण्यास कोर्टाने या व्यक्तीवर बंदी आणली आहे. आधीच तो 550 मुलांचा बाप आहे.

Updated: Apr 29, 2023, 06:40 PM IST
आता बस झालं! 550 मुलांच्या बापावर कोर्टाने आणली बंदी, हैराण करणारं कारण title=

Sperm Donation : नेदरलँड कोर्टाने (Dutch Court) शुक्रवारी आतापर्यंत कधीही ऐकलं नसेल अशा एका प्रकरणात निर्णय सुनावला. आता बस झालं, आणखी मुलांना जन्माला घालू शकत नाहीस असा आदेश कोर्टाने एका व्यक्तीला दिला. या व्यक्तीची देशभरात 550 मुलं आहेत. कोर्टाचा आदेश मानला नाही तर त्या व्यक्तीला 1.10 लाख डॉलर म्हणजे जवळपास 89.89 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?
या व्यक्तीचं नाव जोनाथन मीजर (Jonathan Meijer) असं असून तो स्पर्म डोनर (Sperm Donor) आहे. जोनाथनच्या स्पर्मपासून देशभरात 500 ते 550 मुलं जन्माला आली आहेत. वैद्यकीय भाषेत तो या मुलांचा जैविक पिता (Biological Father) आहे. ज्या रुग्णालयात त्याचे शुक्राणू डोनेट केले आहेत ते सर्व नष्ट करावेत असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. ज्या जोडप्याने आधीच बुकिंग केलं आहे ते नष्ट केले जाणार नसल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

एका संस्थेने जोनाथन जोनाथनविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. जोनाथनचा स्पर्म डोनेटचा अधिकार संपुष्टात आल्याचं या तक्रारीत नोंदवण्यात आलं आहे. जोनाथनच्या शुक्राणूपासून जन्माला आलेली एखादी मुलगी आणि मुलाचे एकमेकांशी प्रेमसंबंध जुळले तर ती इनब्रीडिंगची प्रक्रिया असेल, जी मानवतेसाठी धोकादायक असेल असंही या संस्थेने म्हटलं  आहे. 

2017 मध्ये जोनाथनच्या स्पर्म डोनेशनचं प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आलं. त्यावेळी नेदरलँडमध्ये जोनाथन 100 मुलांचा जैविक पिता बनला होता. यानंतर त्याला नेदरलँडमधल्या फर्टिलिटी क्लिनिक्सच्या स्पर्म डोनेशनमधून काळ्या यादीत टाकण्यात आलं. जोनाथनने 10 क्लिनिकमध्ये स्पर्म डोनेट केले होते. त्यानंतर अनेक महिलांनी त्याच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती.

पण जोनाथनने आपली सवय बदलली नाही. त्याने इतर देशांमध्ये स्पर्म डोनेशन सुरु केलं. यासाठी त्याने डॅनिश स्पर्म बँक क्रायोसची निवड केली. जगातील वेगवेगळ्या देशात ही स्पर्म बँक काम करते. त्यामुळे जोनाथनची जगभरातील अनेक देशांमध्ये मुलं आहेत. स्पर्म विकण्यासाठी जोनाथनने अनेकवेळा आपलं नावही बदललं. स्पर्म डोनेट करुन त्याला चांगले पैसेही मिळत होते. 

स्पर्म डोनेशन म्हणजे काय?
वंध्यत्वाची समस्या असलेल्या जोडप्याला विज्ञानाच्या मदतीने मूल होण्यासाठी ही प्रक्रिया वापरली जाते. यासाठी प्रजननक्षम पुरुषाचे वीर्य वापरले जाते. या प्रक्रियेत स्पर्म डोनर हा अनोळखी किंवा त्या जोडप्याच्या ओळखीचा असू शकतो. स्पर्म डोनर्सना शुक्राणू दान करण्यापूर्वी शारीरिक आणि मानसिक वैद्यकीय तपासणी करावी लागते.