रियो दी जेनेरियो : ब्राझीलमधीली एका शाळेच्या सुरक्षारक्षकाने चार मुलांना आणि शिक्षकाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेत शिक्षकांसोबतच चारही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, आरोपी सुरक्षारक्षकाचाही आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होरिजोंटो शहरापासून ६०० किमी दूर असलेल्या एका नर्सरी शाळेत हा प्रकार घडला आहे. शुक्रवारी सकाळी शाळेच्या सुरक्षारक्षकाने चार विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकावर अल्कोहोल टाकून आग लावली.
या दुर्घटनेत एकूण ५० जण जखमी झाले. जखमींना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जी वन न्यूज वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, मृत विद्यार्थ्यांचं वय चार वर्ष आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक हा मानसिक रुग्ण होता आणि त्यामुळेच त्याने हे कृत्य केलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी सुरक्षारक्षकाच्या घरात अल्कोहोलच्या बाटल्या आढळल्या आहेत. हा सुरक्षारक्षक गेल्या आठ वर्षांपासून नर्सरीत काम करत होता.