India On Canada Nijjar Murder At UNGA: भारताने मंगळवारी संयुक्त राष्ट्रातील सदस्य देशांना दहशतवाद, कट्टरतावादी आणि हिंसांचारासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करताना 'राजकीय सवलत' आडवी येऊ देता कामा नये असं आवाहन केलं आहे. कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसंदर्भात सध्या कॅनडाबरोबर सुरु असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने थेट अंतरराष्ट्रीय मंचावरुन हे विधान करत कॅनडीयन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका मांडली. संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या 78 व्या सत्राला संबोधित करताना एस. जयशकंर यांनी, श्रेत्रीय अखंडतेचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे असं सांगतानाच देशाच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याच्या घटना निवडक पद्धतीने स्वीकारता येणार नाहीत असंही म्हटलं. ते दिवस गेले जेव्हा संयुक्त राष्ट्र अजेंडा ठरवतील आणि इतर देश त्यांचं ऐकतील असं मानलं जायचं. आता परिस्थिती तशी राहिलेली नाही, असं एस. जयशंकर यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं.
"आपण टीका, भेदभावसारखा अन्याय पुन्हा होऊ देता कामा नये. पर्यावरणासंदर्भातील ऐतिहासिक जबाबदाऱ्यांपासून आपण पळू शकत नाही. अन्न तसेच ऊर्जा गरजूंच्या हातून काढून श्रीमंत लोकांना त्याला लाभ मिळवून देण्यासाठी बाजारपेठेचा वापर करता कामा नये याचीही आपण काळजी घेतली पाहिजे," असं एस. जयशंकर म्हणाले. तसेच त्यांनी, "राजकीय सवलतीच्या नावाखाली दहशतवाद, कट्टरतावाद आणि हिंसेच्या माध्यमातून प्रतिक्रिया देणं टाळलं पाहिजे. श्रेत्रीय अखंडतेचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे. तसेच कोणत्याही देशाच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याच्या घटना निवडक पद्धतीने स्वीकारता येणार नाहीत," असंही एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत म्हणाले.
एस. जयशंकर यांनी आपल्या विधानामधून अमेरिकेला टोला लगावल्याचं सांगितलं जात आहे. कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकेने गुप्त माहिती कॅनडाला उपलब्ध करुन दिल्याच्या पार्श्वभूमीवर एस. जयशंकर यांनी थेट अंतरराष्ट्रीय मंचावरुन अमेरिकेला सुनावलं आहे. राजकीय सवलतीचा मुद्दा हा कॅनडाला टोला लगावण्यासाठी एस. जयशंकर यांनी उपस्थित केल्याचं सांगितलं जातं. शीख समुदायाला केंद्रस्थानी ठेऊन राजकारण करण्याच्या उद्देशाने जस्टीन ट्रूडो यांचा पक्ष उघडपणे खलिस्तान्यांना समर्थन करत असल्याचं यापूर्वीही अनेकदा समोर आलेलं आहे.
अशातच मागील सोमवारी ट्र्डो यांनी कॅनडाच्या संसदेमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सचा सहभाग असल्याचा आरोप केल्याने भारताबरोबरच कॅनडाचे संबंध कमालीचे बिघडले आहेत. भारताने ट्रूडो यांचे हे आरोप बीनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं सांगत फेटाळले होते.