Russia Ukraine War : युद्धभूमीत युक्रेनच्या महिला सैनिकाचा अखेरचा श्वास; कुटुंबीय पार्थिवाच्या प्रतीक्षेत

मायभूमीसाठी प्राण त्यागणारी खरीखुरी माय

Updated: Mar 18, 2022, 12:38 PM IST
Russia Ukraine War : युद्धभूमीत युक्रेनच्या महिला सैनिकाचा अखेरचा श्वास; कुटुंबीय पार्थिवाच्या प्रतीक्षेत  title=

नवी दिल्ली : रशिया  (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) या दोन्ही देशांमध्ये सुरु असणारा संघर्ष आता वेगळ्या वळणावर आला आहे. रशियानं हल्ला केलेला असतानाच युक्रेनमधून सर्वसामान्य नागरिकांपासून ते खुद्द राजकीय नेतेमंडळीही रणांगणाल आले. दर दिवशी संपूर्ण जगात युद्धभूमीतील बातम्यांनी तणाव आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आता काळजावरच वार करणारी एक बातमी समोर आली आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात असतानाच आता एक असा फोटो लक्ष वेधत आहे जो मनात भावनांचा काहूर माजवत आहे. कारण हा फोटो आहे युद्धभूमीत शहीद झालेल्या एका महिला सैनिकाचा.

48 वर्षीय ओल्गा सेमिडानोवा (Olga Semidyanova) यांना या युद्धात आपला जीव गमवावा लागला आहे. 12 मुलांची आई असणाऱ्या या मातेच्या निधनानं तिच्या लेकरांवरचं मायेचं छत्र कायमचं नाहीसं झालं आहे.

ओल्गा सेमिडानोवा (Olga Semidyanova) यांना स्वत:ची 6 मुलं, तर त्यांनी 6 मुलं दत्तक घेत त्यांचंही पालकत्त्वं स्वीकारलं होतं. सैन्याच्या वैद्यकिय विभागात त्या सेवेत होत्या. जेव्हा मायभूमी आणि कर्मभूमी युक्रेनला त्यांच्या साहसाची गरज होती तेव्हा त्या मोठ्या धीरानं रशियाविरोधात उभ्या ठाकल्या होत्या.

मायभूमीसाठी ही माय तिच्या लेकरांपासून कायमची दुरावली. पण, तिचं हे बलिदान संपूर्ण जगाला लक्षात राहील यात दुमत नाही. 3 मार्च रोजी जेव्हा रशियन सैन्य धडकलं तेव्हाही त्यांनी परिस्थितीचा पाय घट्ट रोवून सामना केला होता.

केव्हापासून होत्या सेवेत?

ओल्गा 2014 पासून सेनेत रुजू झाल्या होत्या. जेव्हा डोनेत्स्क आणि जापोरिज्जिया ओब्लास्टमधील सीमेवर रशियन सैन्य मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ लागलं तेव्हा ओल्गा यांनी पलटवार केला. जिथं त्यांना वीरमरण आलं.

ओल्गा यांच्या कुटुंबाकडे अद्यापही त्यांचं पार्थिव सोपवण्यात आलेला नाही. ज्यामुळं एका युद्धानं लेकरांची आई हिरावलीच पण त्यांना तिची अखेरची झलक पाहण्यापासूनही दूर ठेवलं हीच शोकांतिका समोर येत आहे.