जीवघेण्या 'ब्लू व्हेल’ गेमच्या मास्टरमाईंड तरूणीला अटक

जगभरात हैदोस घातलेल्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंड तरूणीला अटक करण्यात आलं आहे. एका १७ वर्षीय तरूणीने हा गेम तयार केला असून रशियन पोलिसांनी तिला अटक केली. या मुलीवर आरोप आहे की, जीवघेण्या ब्लू व्हेल गेमच्या मागे तिचाच हात आहे.

Updated: Sep 1, 2017, 01:15 PM IST
जीवघेण्या 'ब्लू व्हेल’ गेमच्या मास्टरमाईंड तरूणीला अटक title=

मॉस्को : जगभरात हैदोस घातलेल्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंड तरूणीला अटक करण्यात आलं आहे. एका १७ वर्षीय तरूणीने हा गेम तयार केला असून रशियन पोलिसांनी तिला अटक केली. या जीवघेण्या ब्लू व्हेल गेमच्या मागे तिचाच हात असल्याचा तिच्यावर आरोप आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, ही तरूणी समोरील व्यक्तीला धमकी द्यायची की, ब्लू व्हेल गेमचा टास्क पूर्ण केला नाही तर ती त्याच्या आणि त्याच्या परिवाराची हत्या करेल. ब्लू व्हेल गेम हा त्याच लोकांना जाळ्यात घेतो जे तणावात आहेत आणि आत्महत्या करण्याचा विचार करतात.   

रशियन पोलिसांकडून एक फुटेज जाहीर करण्यात आलं आहे. यात एका रेडमध्ये आरोपी मुलीला तिच्याच घरातून अटक करण्यात आल्याचे दिसते. आरोपी मुलगी ही सायकॉलॉजी विषयाची विद्यार्थिनी आहे. या मुलीने आपला गुन्हा कबूल केला आहे. कोर्टात सादर करण्यात आल्यानंतर तिला तीन वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. 

जीवघेणा गेम -

या गेममध्ये साईन केल्यानंतर ५० दिवसात टास्क पूर्ण करण्याचं चॅलेन्ज दिलं जातं. यात स्वत:ला नुकसान पोहोचवणे, एकट्यात हॉरर सिनेमे बघणे आणि व्हेलचे चित्र हातावर गोंदणे असे चॅलेन्ज दिले जाते. या गेममधील सर्वात घातक टास्क ५०व्या दिवशी दिला जातो, ज्यात स्वत:ला जीवे मारण्याचं चॅलेन्ज दिलं जातं. 

काय आहे ब्लू व्हेल गेम?

‘ब्लू व्हेल गेम’ रशियातील फिलीप बुडेकिन नावाच्या व्यक्तीने २०१३ मध्ये तयार केला होता. या गेममध्ये ग्रुप अ‍ॅडमिनकडून काही टास्क दिले जातात जे ५० दिवसांमध्ये पूर्ण करावे लागतात. प्रत्येक टास्क पूर्ण केल्यावर प्लेअरला त्याच्या हातावर एक रेष कोरण्यास सांगितले जाते. असे करता करता शेवटी जे चित्र तयार होतं ते एका व्हेलचं असतं. 

हातावर ब्लेडने F57 लिहावे लागते -

गेम खेळणा-याला प्रत्येक दिवशी एक कोड दिला जातो. यात हातावर ब्लेडने F57 लिहून फोटो अपलोड करावा लागतो. या गेमचा अ‍ॅडमिन गेम खेळणा-या व्यक्तीसोबत स्काईपच्या माध्यमातून संवाद साधत असतो. धक्कादायक बाब म्हणजे गेमचा विजेता त्याला ठरवला जातो जो शेवटच्या दिवशी आत्महत्या करतो. 

भारतातही या गेमची क्रेझ-

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूरमध्ये एका १०वीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्याआधी मुंबईतही एका तरूणाने चौदाव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. तसेच इंदोरमध्ये एका १३ वर्षाच्या विद्यार्थ्याने त्याच्या शाळेच्या इमारतीवरून उडी मारून कथित रूपात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला वाचवण्यात यश आले.  

आत्तापर्यंत १३० लोकांचा मृत्यू

लहान मुलं गेम समजून याच्या जाळ्यात अडकत आहेत. सोशल मीडियात ब्लू व्हेल अ‍ॅपचा शोध घेतला जात आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे हा ना गेम आहे ना याचं अ‍ॅप आहे. हा गुन्हेगारी प्रवॄत्तीच्या लोकांचा एक ट्रॅप आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जगभरात यामुळे १३० लोकांचा मृत्यू झाला आहे.