मोदींसोबत 100 भारतीय सीइओ दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला लावणार हजेरी

अंबानी, चंदा कोचर, शाहरूखसह अनेक दिग्गज राहणार हजर.

Updated: Dec 24, 2017, 05:40 PM IST
मोदींसोबत 100 भारतीय सीइओ दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला लावणार हजेरी title=

नवी दिल्ली : अंबानी, चंदा कोचर, शाहरूखसह अनेक दिग्गज राहणार हजर.

निसर्गरम्य दावोसमध्ये परिषद

स्वित्झर्लंडच्या निसर्गरम्य दावोस शहरात होणाऱ्य़ा जागतिक अर्थ परिषदेसाठी (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. पुढील महिन्यात ही परिषद होणार आहे. तिथे एका खास कार्यक्रमात मोदींचं भाषणसुद्धा होणार आहे. 

100 पेक्षा जास्त सीइओ

या परिषदेला उपस्थित राहणाऱ्यांची यादी पुढील महिन्यात जाहीर करण्यात येईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मात्र या वेळेस भारताची तगडी उपस्थिती असणार आहे. या वर्षी 100 पेक्षा जास्त सीइओ हजेरी लावणार आहेत. 

जगभरातील मातब्बर

या परिषदेला जगभरातून जवळपास 3,000 पेक्षा जास्त जागतिक नेते, सीइओ, राष्ट्रप्रमुख, कलाकार आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मोदी पहिल्यांदाच या परिषदेला हजर राहणार असल्यामुळे ते काय बोलतात याकडे सर्वाचंच लक्ष असणार आहे.

टिम इंडीया

भारताकडून मुकेश अंबानी, चंदा कोचर, उदय कोटक, बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरूख खान, करण जोहर, अर्थमंत्री अरुण जेटली, सुरेश प्रभू, पीयूष गोयल, नितीन गडकरी, धर्मेद्र प्रधान, अमिताभ कांत, रमेश अभिषेक, रिझर्व बॅँकेच्या माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासारखे दिग्गज या जागतिक अर्थ परिषदेला हजर राहणार आहेत. मुकेश अंबानी आपली पत्नी नीता तसंच मुलं आकाश आणि ईशा सोबत हजर राहण्याची शक्यता आहे.