इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये महागाई दिवसेंदिवस आभाळाला भिडतेय. भाज्या आणि दुधांच्या वाढत्या किंमतीनंतर आता जनतेवर महागड्या पेट्रोल-डिझेलचा भार पडतोय. पुढच्या काही दिवसांत हा भार आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीची (ECC) शुक्रवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार, देशात मे महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत ९ रुपये प्रती लीटरपर्यंत वाढ करण्यात आलीय. 'ARY न्यूज'नं ही माहिती दिलीय.
या वाढीसोबत पाकिस्तानात पेट्रोलच्या किंमती प्रती लीटर किंमत १०८ रुपयांपर्यंत पोहचल्यात. बैठकीत डिझेलच्या किंमतींत ४.८९ रुपये प्रती लिटर तर लाईट डिझेलमध्ये ६.४० रुपये प्रती लीटर वाढ झालीय. सोबतच केरोसिनच्या किंमतीत ७.४६ रुपये प्रती लीटरपर्यंत प्रस्तावित वाढीला मंजुरी मिळालीय.
'ऑईल एन्ड गॅस रेग्युलटरी अथॉरिटी'नं पेट्रोलच्या किंमतीत १४ रुपये प्रती लीटरपर्यंत वाढीची मागणी केली होती. त्यानंतर पंतप्रधान इमरान खान यांनी हे प्रकरण आर्थिक समन्वय समिती (ECC) कडे धाडलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वृद्धी आणि मुद्रा अवमूल्यनमुळे हा निर्णय पाकिस्तानला घ्यावा लागलाय.