नवी दिल्ली: सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमती हा चर्चेचा विषय आहे. यावरून मोदी सरकारला सध्या सामान्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. मात्र, पेट्रोल-डिझेलची दरवाढीची समस्या ही केवळ भारतापुरती मर्यादित नाही. तर भारताच्या शेजारील देशांमध्येही पेट्रोल-डिझेलचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडताना दिसत आहेत.
पाकिस्तानमध्ये २५ रुपयांची वाढ
कोरोनाच्या संकटामुळे अगोदरच कंगाल असलेल्या पाकिस्तानला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. इम्रान खान यांच्या सरकारने पेट्रोलच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रतिलीटर पेट्रोलसाठी १००.१० रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलच्या किंमतीतही सरकारने २१.३१ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे प्रतिलीटर डिझेलचा दर १००.१४ इतका झाला आहे. याशिवाय, केरोसीन आणि लाईट डीझेल ऑईलच्या दरांतही अनुक्रमे २३.५० आणि १७.८४ रुपयांची वाढ झाली आहे.
श्रीलंकेत इंधनाचे दर भारतापेक्षा स्वस्त
श्रीलंकेत २२ जून रोजी जाहीर झालेल्या दरांनुसार, पेट्रोलची किंमत प्रतिलीटर ६५.७६ इतकी आहे. तर एका लीटर डिझेलसाठी ४२.४८ रुपये मोजावे लागत आहेत.
नेपाळमध्ये डिझेल भारतापेक्षा महाग
नेपाळच्या चलनानुसार सध्या याठिकाणी एका लीटर डिझेलसाठी ८५ रुपये तर पेट्रोलसाठी ९६ रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, भारतीय चलनाचा विचार करायचा झाल्यास डिझेल आणि पेट्रोलचे दर अनुक्रमे ५३.२९ आणि ६०.१८ रुपये इतके आहेत.
बांगलादेशमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर काय?
बांगलादेशमध्ये २२ जूनच्या आकडेवारीनुसार डिझेलचा दर ५८.३९ प्रतिलीटर इतका आहे. तर एका लीटर पेट्रोलसाठी ७९.९५ रुपये मोजावे लागत आहेत.
मॉरिशिअसमध्ये इंधनाच्या दरात मोठी वाढ
भारतीय चलनानुसार मॉरिशिअसमध्ये प्रतिलीटर डिझेलासाठी ८३.१० रुपये मोजावे लागत आहेत. तर एक लीटर पेट्रोलची किंमत ६६.१० रुपये इतकी आहे.