VIDEO : पाकिस्तानात महिला टिकटॉकरवर जमावाचा हल्ला, मारहाण करत कपडेही फाडले

पाकिस्तानमधल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून जगभरात संताप व्यक्त केला जात आहे

Updated: Aug 18, 2021, 06:50 PM IST
VIDEO : पाकिस्तानात महिला टिकटॉकरवर जमावाचा हल्ला, मारहाण करत कपडेही फाडले title=

लाहोर : पाकिस्तानमध्ये 300 ते 400 लोकांच्या जमावाने एका महिलेसोबत केलेल्या लज्जास्पद कृत्याची सध्या जगभर चर्चा होत आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी ही गंभीर घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हि महिला टिकटॉकर असून आपल्या मित्रांसोबत ती लाहोर इथल्या मीनार-ए-पाकिस्तान या ठिकाणी टिकटॉक व्हिडिओ बनवत होती. यावेळी अचानक 300 ते 400 जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. लोकांनी या महिलेला आणि तिच्या मित्रांना जबर मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. इतकंच नाही तर लोकांनी या महिलेला वर उचलून हवेत फेकलं. 

महिलेच्या म्हणण्यानुसार, 'गर्दी प्रचंड होती आणि लोक कुंपण ओलांडून आमच्या दिशेने येत होते. लोक मला धक्का देत होते आणि खेचत होते ज्यामुळे माझे कपडे फाटले. काही लोकांनी आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पण गर्दी प्रचंड होती. महिलेने पुढे सांगितले की तिच्या मित्रांनाही मारहाण करण्यात आली. या दरम्यान जमावाने तिची अंगठी आणि कानातले 'हिसकावले'. त्याच्या साथीदाराचा मोबाईल फोन, ओळखपत्र आणि त्याच्यासोबत असलेले 15 हजार रुपयेही हिसकावले, असं महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

या घटनेनंतर जगभरात संताप व्यक्त होत आहे. पाकिस्तानी लोकांच्या या कृत्यावर सोशल मीडियावरही जोरदार टीका होत आहे. ट्विटरवरही #minarepakistan ट्रेंड होत आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.