लाहोर: पाकिस्तानी लष्कराकडून गुरुवारी रात्री गझनवी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, गझनवी हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र २९० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. तसेच या क्षेपणास्त्राद्वारे विविध स्फोटके वाहून नेता येऊ शकतात.
या क्षेपणास्त्र चाचणीसाठी पाकिस्तानने कराची शहरातील हवाई क्षेत्राचा काही भाग ३१ ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने या चाचणीआधी नोटॅम जारी केला होता. तसेच कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन हवाई वाहतूक बंद करण्यात आली होती.
काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्ताने गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने या तणावात आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची ही कृती म्हणजे युद्धखोरी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पाकिस्तानला युद्ध हवंय? जाणून घ्या काय आहे LoCवरील सद्यस्थिती
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी नेत्यांकडून सातत्याने भारताला युद्धाची धमकी दिली जात आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला केला तर युद्धाला तोंड फुटेल. यानंतर पाकिस्तान युद्धात उतरला तर संपूर्ण भारतीय उपखंडाचा नकाशा बदलून जाईल, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी केली होती.
Pakistan successfully carried out night training launch of surface to surface ballistic missile Ghaznavi, capable of delivering multiple types of warheads upto 290 KMs. CJCSC & Services Chiefs congrat team. President & PM conveyed appreciation to team & congrats to the nation. pic.twitter.com/hmoUKRPWev
— DG ISPR (@OfficialDGISPR) August 29, 2019
तर पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारणासंबंधीच्या विशेष सहाय्यक फिरदौस आशिक अवान यांनीही युद्धाचा राग आळवला होता. काहीही झाले तरी पाकिस्तान युद्ध पुकारणार नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणार नाही. पण युद्धासारखी स्थिती निर्माण झाली तर प्रत्येक पाकिस्तानी आपल्या सैन्यासोबत लढेल. आम्हीच या युद्धाचा शेवट करू, असे फिरदौस आशिक अवान यांनी म्हटले होते.
'काश्मीरसाठी कोणत्याही थराला जाऊ'; इम्रान खान यांची पोकळ धमकी