सुदानमधल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी Operation Kaveri सुरु; परराष्ट्र मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Operation Kaveri : सुदानमध्ये सुरु असलेल्या संघर्षातून सुदानच्या लष्कराने दुसऱ्या देशातील नागरिकांना बाहेर पडण्याची परवानगी दिल्यानंतर अनेकांनी आपल्या नागरिकांचे बचावकार्य सुरु केले आहे. मोदी सरकारनेही भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरु केले आहे.

Updated: Apr 24, 2023, 06:41 PM IST
सुदानमधल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी Operation Kaveri सुरु; परराष्ट्र मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती title=

Sudan Conflict : सुदानमध्ये (Sudan News) गेल्या काही दिवसांपासून गृहयुद्ध (civil war) सुरू असून आतापर्यंत 400 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. युद्धग्रस्त सुदानमध्ये हजारो भारतीय अद्यापही अडकून पडले आहेत. यामुळे मोदी सरकारने (Modi Government) आता भारतीयांना परत आणण्यासाठी  प्रयत्न सुरु केले आहेत. याआधी भारतीयांच्या सुटकेसाठी सरकारने सुदानच्या बंदरात आयएनएस सुमेधा ही नौदलाची नौका पाठविली होती. यासोबतच सौदी अरेबियाच्या जेद्दाह विमानतळावरही दोन लष्करी वाहतुकीची विमाने तैनात ठेवली होती. यानंतर आता भारत सरकारने युद्धग्रस्त सुदानमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri) सुरू केले आहे.

याआधी सौदी अरेबियाने सुदानमधून मित्रदेशांच्या 66 नागरिकांची सुटका केली होती. यामध्ये काही भारतीयसुद्धा होते. तसेच अमेरिकेच्या लष्कराने रविवारी सुदानमधील अधिकाऱ्यांना सुदान बाहेर काढले होते. त्यानंतर आता भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने ऑपरेशन कावेरी सुरू केले आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून याची माहिती दिली.  'सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले आहे. सुमारे 500 भारतीय सुदानच्या बंदरावर पोहोचले आहेत. आणखी काही नागरिक पोहचत आहेत. त्यांना घरी आणण्यासाठी आपली जहाजे आणि विमाने सज्ज आहेत, असे एस जयशंकर यांनी म्हटले आहे.

सुदानमध्ये दोन लष्करी सेनापतींमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू आहे. सुदानची राजधानी खार्तूमनंतर आता नाईल नदीलगतच्या ओमदुरमन शहरातही संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या संघर्षामध्ये तीन हजार भारतीय नागरिक सुदानच्या विविध भागांत अडकले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या संघर्षात केरळच्या अल्बर्ट ऑगस्टिन यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आफ्रिकन देश सुदानमध्ये 15 एप्रिलपासून लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. राजधानी खार्तूमसह देशाच्या अनेक भागात स्फोट आणि गोळीबाराच्या घटना घडत आहेत. सुदानच्या राजधानीतून हजारो रहिवासी आपल्या जीव वाचण्यासाठी पळत आहेत. या लढाईत निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अन्नधान्याचा अपुरा पुरवठा, खंडित झालेला वीजपुरवठा, पाणीटंचाई यामुळे घरात अडकलेले नागरिक त्रस्त आहेत. संपूर्ण सुदानमध्ये इंटरनेट बंदी असल्याची माहितीही समोर आली आहे. दुसरीकडे विविध देशांनी त्यांच्या नागरिकांनी सुदानमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.