Heatwave : जागतिक तापमानवाढीचा मुद्दा मागील काही वर्षांपासून प्रचंड चर्चेत आला आणि आता हाच मुद्दा पुन्हा प्रकाशझोतात येताना दिसत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे जगाच्या विविध भागांमध्ये होणारे हवामानातील बदल. क्षणात बदलणारं हवामान, तापमान वाढ पाहता आंतरराष्ट्रीय पातळीवर ही बाब सध्या चिंता वाढवताना दिसत आहे. शास्त्रज्ञांनी नुकतीच एक आकडेवारी जगासमोर आणली असून, जगभरातील महासागराच्या पृष्ठाचं तापमान 20.96 अंशांवर पोहोचल्याची बाब निदर्शनास आणली आहे. हे आतापर्यंतचं सर्वात जास्त तापमान ठरत आहे.
महासागराच्या तापमानात वाढ का झाली, यामागचं कारण शास्त्रज्ञ शोधत असून, हवामान बदल हे यामागचं मुख्य कारण ठरत असल्याचा दावा करण्यात येत आहे. हरितगृह वायू अर्थात greenhouse gas emissions मुळं समुद्राचा पृष्ठभाग अधिक उष्ण होत आहेत.
लक्षात घेण्याची बाब म्हणजे महासारगांचं तापमान वाढल्यामुळं त्यांची कार्बन डायऑक्साईड शोषण्याची क्षमता कमी होऊन तापमान वाढीस कारणीभूत असणारा हा वायू वातावरणातच टिकून राहतो. Intergovernmental Panel on Climate Change (IPCC) च्या अहवालानुसार सागरी पृष्ठाचं तापमान वाढण्याचं प्रमाण 1982 ते 2016 या काळात दुपटीनं वाढलं. या साऱ्याचा थेट परिणाम सागरी जीवसृष्टीसह अन्नसाखळीवर झाला. इतकंच नव्हे तर शार्कसारख्या महाकाय मत्स्य प्रजाती अधिक हिंसक झाल्याचंही निरीक्षणातून समोर आलं.
सध्याच्या घडीला पॅसिफिक महासागरात सक्रिय असणारा अल निनो हासुद्धा या तापमानवाढीमागचं कारण ठरत आहे. सध्या अल निनोनं तीव्र स्वरुप धारण केलं नसलं तरीही सागरी पृष्ठावरील तापमानावर मात्र याचे थेट आणि तितकेच गंभीर परिणाम दिसून येत आहेत.
जागतिक तापमानवाढीच्या झळा जगभरातील विविध देशांमध्ये जाणवत असून, सध्या इराणमध्ये परिस्थितीनं वाईट रुप घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तापमानानं 51 अंशाचा आकडा गाठल्यामुळं उष्माघाताचा धोका पाहता इथं लहान मुलं , वृद्ध आणि आजारी व्यक्तींना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शाळा, सर्व प्रकारची कार्यालयं इतकंच नव्हे, तर बँकाही बंद ठेवण्याचा निर्णय इराण सरकारनं घेतला आहे.
तिथे रशिया, मेक्सिको आणि फिलिपिन्समध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत असून, दैनंदिन जीवनावर याचे परिणाम होत असल्याचं दिसत आहे. तर, ग्रीसमध्येही कामाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले असून, दुपारी नोकरीवर येण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत.