New Labour Code: भारतात नव्या लेबर कोडची जोरदार तयारी सुरु आहे. नव्या लेबर कोडनुसार कर्मचाऱ्यांना 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी मिळणार (4 days work week) आहे. या संकल्पनेवर सध्या तयारी सुरु असून राज्यांच्या ग्रीम सिग्नलची वाट पाहिली जात आहे. नवीन वेतन संहितेनुसार, पगारदारांना आठवड्यातून चार दिवस काम करण्याचा आणि तीन दिवस सुट्टीचा पर्याय आहे. आठवड्यातून तीन दिवस सुट्टीचा पर्याय घेणार्या लोकांना दररोज ऑफिसमध्ये 12 तास काम करावे लागेल, याचा अर्थ असा आहे की कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आठवड्यातून 48 तास काम करावे लागेल.
भारतात नव्या लेबर कोडची तयारी सुरु असली तरी ब्रिटनमध्ये (Britain) याची चाचणीही सुरु करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये अनेक कंपन्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर 4 दिवस 12 तास कामाची पद्धत सुरु करण्यात आली आहे. काही कंपन्यांमध्ये सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही संकल्पना राबवली जात असून यातले तीन महिने पूर्ण झाले आहेत. पहिल्या तीन महिन्यातले काही निष्कर्ष समोर आले आहेत.
नव्या लेबर कोडचे फायदे-तोटे
ब्रिटनमधल्या लिटरल ह्यूमन्स या कंपनीत न्यू लेबर कोड (News Labour Code) पद्धत राबवली जात असून कंपनीचे सह संस्थापक गॅडसबी पीट यांनी या पद्धतीबद्दल फायदे तोटे सांगितले आहेत. पीट यांनी केलेल्या दाव्यानुसार याचे तोटे कमी आणि फायदे जास्त आहेत. या धोरणांतर्गत उत्पादकता 5 टक्क्यांनी वाढली आहे, तसंच कर्मचाऱ्यांच्या आनंदात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे कंपनीला चांगलं टॅलेंट मिळालं असल्याचं पीट यांनी म्हटलंय.
4 दिवस कामाचे या धोरणाचा कंपनीला सुरुवातीला मोठा त्रास सहन करावा लागला. सुरुवातील कर्मचाऱ्यांवर 12 तास कामाचा तणाव जाणवत होता. पण कालांतराने त्यांना याची सवय झाली, तीन दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर परतलेले कर्मचारी जास्त आनंदी आणि उत्साही दिसत होते. कर्मचाऱ्यांना देखील ही पद्धत आवडली असून पाच किंवा सहा दिवसांच्या वर्किंग डेच्या पद्धतीसाठी ते आता तयार नाहीत.
सर्व्हेमध्ये काय निष्कर्ष
ब्रिटनमध्ये न्यू लेबर कोडवर एक सर्व्हे (Survey) करण्यात आला. यात 63 टक्के कंपन्यांनी या धोरणाच्या बाजूने मत दिलं आहे. कारण या कामाच्या संकल्पनेतून चांगलं टॅलेंट मिळत आहे, असा कंपन्यांचा दावा आहे. तर जवळपास 78 टक्के कर्मचाऱ्यांनीही या धोरणाला पसंती दर्शवली आहे. या धोरणामुळे तणाव कमी होत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. कर्मचारी पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक उर्जेने कार्यालयीन काम करत आहेत. ब्रिटननंतर कॅनडा आणि अमेरिकेशिवाय युरोपातील अनेक देशांमध्ये ही संकल्पना चाचणी म्हणून राबवली जात आहे. भारतातही लवकरच हे धोरण लागू होण्याची प्रतीक्षा आहे.