महिला आजकाल कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. मग ते राजकारण असो, खेळ असो किंवा डॉक्टर क्षेत्र. असंच एका अहवालानुसार समोर आलेल्या माहितीप्रमाणे, पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी रूग्णावर उपचार केल्यास त्याच्या वाचण्याची शक्यता वाढते. महिलांनी उपचार केलेले रुग्ण पुन्हा रुग्णालयात दाखल होत नाही किंवा त्याचा मृत्यू होण्याची शक्यता कमी होते, असा एक रिपोर्ट समोर आला आहे.
एनल्स ऑफ इंटरनल मेडिसीनमध्ये प्रकाशिक झालेल्या अभ्यासानुसार, पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रुग्णांपेक्षा महिला डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रूग्णांचा मृत्यू आणि रूग्णालयात पुन्हा दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे. हा अभ्यास एकूण 7,76,00 रुग्णांवर करण्यात आला होता. ज्यामध्ये 4,58,100 महिला आणि सुमारे 3,18,000 रुग्ण पुरुष होते. या रूग्णांना 2016 ते 2019 दरम्यान दाखल करण्यात आलं होतं.
अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, महिला डॉक्टरांद्वारे उपचार केल्यावर रुग्णांचा मृत्यू आणि रूग्णालयात पुन्हा भर्ती होण्याचा दर कमी होता. महिला डॉक्टरांद्वारे उपचार केल्यावर महिला रुग्णांचा मृत्यू दर 8.15 टक्के होता, तर पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार केल्यावर मृत्यू दर 8.38 टक्के असल्याचं समोर आलं. याशिवाय महिला डॉक्टरांद्वारे उपचार केल्यावर पुरुष रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 10.15 टक्के आणि पुरुष डॉक्टरांकडून उपचार केल्यावर ते 10.23 टक्के होते.
या संशोधनात असंही आढळून आलं आहे की, महिला डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर झालेल्या सुधारणेला वैद्यकीयदृष्ट्या खूप महत्त्व आहे. संशोधक युसुके त्सुगावा यांच्या सांगण्यानुसार, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, महिला डॉक्टर त्यांच्या रुग्णांची हाय क्वालिटी काळजी घेतात आणि त्यांना महिला डॉक्टरांचा सामाजिक फायदा देखील होतो.
अहवालात पुढे म्हटलंय की, पुरुष असो वा महिला, प्रत्येकाला महिला डॉक्टरांच्या उपचाराचा फायदा झाल्याचं दिसून आलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, महिला डॉक्टर रुग्णांसोबत जास्त वेळ घालवतात आणि त्यांच्या रेकॉर्ड आणि परफॉर्मंसचीही चांगली काळजी घेतात. याशिवाय 2002 मध्ये झालेल्या अभ्यासात असं आढळून आलं की, महिला डॉक्टरांनी रुग्णासोबत सरासरी 23 मिनिटे घालवली, तर पुरुष डॉक्टरांनी 21 मिनिटं घालवतात.