व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणारे मोदी होणार पहिले परदेशी नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड आणि नरेंद्र मोदींची व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे.

Updated: Jun 26, 2017, 11:01 PM IST
व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणारे मोदी होणार पहिले परदेशी नेते title=

वॉशिंग्टन :  पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड आणि नरेंद्र मोदींची व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे. या भेटीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय. ट्रम्प दहशतवादाशी लढण्यासाठी मोदींना किती साथ देतात ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणारे मोदी हे पहिले परदेशी नेते ठरणार आहेत. आत्तापर्यंत ट्रम्प यांनी ४७ परदेशी नेत्यांची भेट घेतली आहे पण पहिल्यांदाच व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी एखाद्या परदेशी नेत्याला जेवणाचं निमंत्रण दिलं आहे.  

ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर मोदींची ही तिसरी भेट असेल. याआधी बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना सप्टेंबर २०१४ आणि जून २०१६मध्ये ओव्हल ऑफिसमध्ये मोदी गेले होते. ओव्हल ऑफिसनंतर मोदी आणि ट्रम्प आणि त्यांचं प्रतिनिधी मंडळ कॅबिनेट रूममध्ये चर्चा करणार आहेत.

या चर्चेमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेंस, संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस, परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल एच आर मॅकस्टार असतील तर मोदींबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोव्हाल, परदेश सचिव एस. जयशंकर आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत नवतेज सरना असतील. यानंतर मोदी आणि ट्रम्प रोज गार्डनमध्ये जाणार आहेत आणि माध्यमांशी चर्चा करणार आहेत.