Mars Water Frost Discovery: पृथ्वीवरील मनुष्याला आता अंतराळातील बाबींविषयी प्रचंड आकर्षण आहे. याचाच एक भाग म्हणून नासा, इस्रोसारख्या अनेक संस्थांकडून अंतराळातील ग्रहांच्या पृष्ठभागावर जाऊन सखोल संशोधन सुरु असते. इस्रोची चांद्रयान, आदित्य एल-1 हे याच मोहिमेचा एक भाग. चंद्रानंतर आता साऱ्यांचे लक्ष मंगळावर लागले आहे. कारण मंगळ ग्रहावरुन महत्वाची अपडेट समोर आली आहे.
मंगळ ग्रहावर वॉटर फ्रॉस्ट म्हणजेच बर्फाचा शोध लागल्यानंतर सर्व शास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्का बसलाय. विषुववृत्ताजवळ प्रथमच पाण्याचे दव दिसून आले आहे. हे क्षेत्र मंगळाच्या उष्णकटिबंधीय प्रदेशांच्या बरोबरीचे आहे. या ठिकाणी बर्फ असणे केवळ अशक्य आहे, असा कयास वैज्ञानिकांकडून आतापर्यंत लावला जात होता.
आता नवीन शोधामुळे मंगळावर पाण्याच्या अस्तित्वाची खात्री पटली आहे.हा शोध भविष्यातील मंगळ मोहिमांसाठी महत्वाचा ठरणार आहे.
युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या दोन अंतराळयानांनी मंगळावरील पाण्याचे बर्फ पाहिले. 2016 मध्ये मंगळ ग्रहावर पोहोचलेल्या ExoMars Trace Gas Orbiter (TGO) द्वारे हे प्रथम शोधण्यात आले होते. त्यानंतर मार्स एक्सप्रेस मिशनमध्येही पाण्याचे तुषार दिसले. दरम्यान 2003 पासून ते मंगळ ग्रहाभोवती फिरत आहेत.
स्वित्झर्लंडच्या बर्न विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी ॲडम व्हॅलेंटिनास याने हे दव शोधून काढले. सध्या तो ब्राऊन विद्यापीठात पोस्टडॉक्टरल संशोधक आहे. त्यांच्या टीमचे संशोधन 10 जून रोजी नेचर जिओसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यानंतर ही माहिती जगासमोर आली
मंगळावरील सर्वात मोठा ज्वालामुखीचा प्रदेश असलेल्या थार्सिस प्रदेशात हे पाण्याचे दव आढळले आहेत. येथे 12 मोठ्या ज्वालामुखी आहेत. यामध्ये ऑलिंपस मॉन्सचाही समावेश आहे. ऑलिंपस मॉन्स हे केवळ मंगळावरीलच नव्हे तर संपूर्ण सूर्यमालेतील सर्वात मोठे शिखर (29.9 किलोमीटर) आहे.
दरम्यान बर्फाचे हे डाग काही काळच दिसतात, नंतर सूर्यप्रकाश आल्यावर काही वेळाने बाष्पीभवन होते, अशी माहितीही देण्यात आलीय. हे फ्रॉस्ट्स इतके पातळ आहेत की ते मानवी केसांच्या आकाराप्रमाणे भासतात. असे असूनही ते एवढ्या मोठ्या क्षेत्रावर पसरलेले आहेत की त्यामध्ये 11 कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी असू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. हे पाणी मंगळाचा पृष्ठभाग आणि त्याचे वातावरण यांच्यामध्ये सतत पुढे-मागे फिरत असते, असेही म्हटले जाते.
'मंगळाच्या विषुववृत्ताभोवती दव पडणे अशक्य आहे असे आम्हाला वाटायचे. सूर्यप्रकाश आणि पातळ वातावरणाच्या संयोगामुळे, पृष्ठभागावर आणि पर्वताच्या शिखरावर तापमान तुलनेने जास्त राहते. हे पृथ्वीच्या विपरीत आहे. व्हॅलेंटीनस यांनी Space.com ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.येथे बर्फाच्या निर्मितीसाठी उपयुक्त असलेली विलक्षण प्रक्रिया सुरु असल्याचेही ते म्हणाले.