...म्हणून अनेकजण सोडतायत अमेरिकेचं नागरिकत्व

एकिकडे कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असतानाच ... 

Updated: Aug 10, 2020, 08:00 PM IST
...म्हणून अनेकजण सोडतायत अमेरिकेचं नागरिकत्व  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

वॉशिंग्टन : एकिकडे कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असतानाच दुसरीकडे अमेरिकेच्या नागरिकत्वास नकार देत त्याचा त्याग करणाऱ्यांची संख्यासुद्धा लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. रविवारीच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 

२०२० या वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये जवळपास ५८०० अमेरिकन नागरिकांनी आतापर्यंत त्यांच्या नागरिकत्वाचा त्याग केला. २०१९ मध्ये जवळपास २०७२ नागरिकांना देशाच्या नागरिकत्वाचा त्याग केला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा नागरिकत्व सोडणाऱ्यांचा आकडा सध्या संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरत असल्याची माहिती  Bambridge Accountants ने प्रसिद्ध केल्याचं कळत आहे. 

 Bambridge Accountantsच्या माहितीनुसार अमेरिकेच्या सरकारकडून दर तीन महिन्यांयतून देण्यात आलेल्या आकडेवारीवरुन ही माहिती समोर आली आहे.  Bambridge Accountants मध्ये भागीदार असणाऱ्या ऍलिस्टेअर बॅम्ब्रिज यांनी CNN ला दिलेल्या माहितीनुसार हे असे नागरिक आहेत, ज्यांनी देश केव्हाच सोडला असून, आता नागरिकत्वाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरसच्या परिस्थिती हाताळण्याची एकंदर पद्धत, देशातील राजकीय परिस्थिती आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रती देशातील वातावरण ही यामागची कारणं ठरत आहेत. 

बॅम्ब्रिज यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्यांनी देशाच्या राजकारणातील वातावरण, राजकीय धोरणं याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय देशातील करप्रणालीबाबतही नागरिकांमध्ये फारसं सकारात्मक वातावरण नाही. परदेशात असणाऱ्या अमेरिकन नागरिकांनाही कर भरणं बंधनकारक आहे. शिवाय परदेशाती त्यांचं खातं, गुंतवणूक आणि निवृत्तीवेतनाबाबत माहिती देणं बंधनकारक असल्याचं बॅम्ब्रिज यांनी सांगितलं. 

अमेरिकेच्या नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या इच्छुकांना $2,350 इतकी रक्कम भरुन ते अमेरिकेत नसल्यास, अमुक एका देशातील अमेरिकेच्या दुतावासात खुद्द हजर राहावं लागणार आहे. येत्या काळात नागरिकांचा हा निर्णय आणि नागरिकत्त्वाचा त्याग करणाऱ्यांची संख्या वाढणारच आहे, असं या अहवालातून सिद्ध झालं आहे. मुख्य म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यास देशाच्या नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे असं वातावरण सध्या अमेरिकेत तयार झालं आहे.