नवी दिल्ली : नेपाळमध्ये पुन्हा डाव्या पक्षांचं सरकार प्रस्थापित होत आहे.
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत डाव्या पक्षांच्या आघाडीला 91 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे माओवादी आणि उदारवादी डावे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे गेल्या जवळपास चार वर्षांपासून अस्थिर राजकारणानं ग्रासलेल्या नेपाळला एक स्थिर सरकार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
माजी पंतप्रधान के पी ओली यांच्या नेतृत्वातली सीपीएन-यूएमएल आणि माजी पंतप्रधान प्रचंड यांच्या नेतृत्वातल्या सीपीएन-माओवादी या दोन्ही पक्षांनी मिळून राज्याच्या विधानसभा आणि संसदेची निवडणूक जिंकली आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीनुसार 165 पैकी कोली यांच्या पक्षाला 66 तर आघाडीतला दुसरापक्ष माओवादी-सेंटरला 25 जागांवर विजय मिळाला आहे.
275 खासदारांच्या नेपाळी संसदेत डाव्या पक्षांच्या विजयामुळे ओली हेच पुढचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. या निवडणूकीमुळे नेपाळमध्ये राजेशाही राजवटीचा अंत होणार आहे. 2008 मध्ये नेपाळमध्ये राजेशाही आणि लोकशाही अशी द्विशासन पद्धती अवलंबण्यात आली. या शासन पद्धतीचा आता शेवट होतो आहे.